२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर आज वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. मँचेस्टरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत चारही सामन्यांत बाजी मारली असून भारताचा एक सामना पावसामुळे वाया गेला. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. फलंदाजीदरम्यान महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या संथ फलंदाजीमुळे भारत सामन्यात मोठी मजल मारु शकला नाही. माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, शोएब अख्तर यांनी देखील टीका केली. भारतीय संघ व्यवस्थापनही विंडीजविरुद्धच्या सामन्यात धोनीच्या फलंदाजीचं स्थान बदलण्याच्या विचारात असल्याची बातमी समोर आली होती. मात्र भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्यामते धोनीच्या संथ फलंदाजी ही चिंता करण्यासाठी गोष्ट नाहीये.

“अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी धोनीशी यासंदर्भात चर्चा केली आहे. यामध्ये सुधारणा कशी करता येईल यावर काम सुरु आहे. धोनी आणि विराट कोहलीची या निकषावर चर्चा करणं चुकीचं आहे. विराट हा सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज आहे. ज्या पद्धतीने विराट आज खेळतो आहे ते पाहता त्याची तुलना कोणाशीही करणं योग्य ठरणार नाही.” विंडीजविरुद्ध सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदते अरुण बोलत होते. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात धोनीने ५२ चेंडू खर्च करुन केवळ २८ धावा केल्या होत्या.

यावेळी धोनीची पाठराखण करताना अरुण म्हणाले,”माझ्यामते धोनीने अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात परिस्थिती पाहून फलंदाजी केली. धोनी आणि केदार मैदानात असताना जर फटकेबाजी करायला गेले असते तर विकेट पडण्याची शक्यता होती. असं झालं असतं तर सामन्यावर याचा परिणाम झाला असता. त्यामुळे धोनीची संथ खेळी आता आमच्यासाठी चिंतेचा विषय नाहीये. सर्व प्रशिक्षकवर्ग यामधून कसा मार्ग काढता येईल यावर काम करत आहेत.” त्यामुळे विंडीजविरुद्धच्या सामन्यात धोनी कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.