भारतीय संघ काल (मंगळवारी) इंग्लंडला रवाना झाला. यंदाचा विश्वचषक हा इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे. त्यामुळे तेथील वातावरणाशी संलग्न होण्यासाठी आणि सराव सामन्यांसाठी भारतीय संघ ८ दिवसाचे अंतर राखून लंडनला रवाना झाला आहे. टीम इंडियाच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. याबरोबरच युवा खेळाडूंना देखील संघात संधी मिळाली आहे. मात्र त्यापैकी चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण असेल? याबाबतचा तिढा अजूनही कायम आहे. या संदर्भात आता टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू याने आपण चौथ्या क्रमांकावर खेळण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे.

“चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याच्या दृष्टीने मी तयारी करत आहे. मी आधीपासूनच या स्थानासाठी तयारी करत होतो. त्यामुळे आता मी मानसिकदृष्ट्या चौथ्या क्रमांकाला फलंदाजीसाठी येण्यास सज्ज झालो आहे. फलंदाजीतील चौथा क्रमांक हा खूप कठीण असतो. कारण कधी चौथ्या क्रमांकाचा खेळाडूला सातव्या किंवा आठव्या षटकात खेळायला यायला लागू शकते, तर कधी तोच खेळाडू ३० ते ३५ व्या षटकात खेळायला येऊ शकतो. सामन्यातील किंवा डावातील हे दोन टप्पे अतिशय भिन्न आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत फलंदाजी करण्यासाठी मी स्वतःला तयार केले आहे”, अशी माहिती विजय शंकरने दिली आहे.

“मी आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके खेळणे हा माझ्या फलंदाजीचा स्वभावधर्म आहे. जर मला फलंदाजीत बढती देण्यात आली तर मी नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो. तसे झाले तर मला खूप आनंद होईल. मी मैदानात जाऊन तेव्हा जी सामन्याची परिस्थिती असेल, त्या प्रमाणे कामगिरी करेन”, असेही विजय शंकर म्हणाला.

“टीम इंडियाकडून जेव्हा मला संधी मिळाली, तेव्हा मी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसात मी टीम इंडियासाठी उत्तम कामगिरी केली आहे. शेवटच्या टप्प्यात गोलंदाजी केली आहे. कठीण प्रसंगी चांगली फलंदाजी केली आहे. मला नेहमीच सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनायचे होते. आणि त्या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहेत, याचा मला अभिमान आहे”, असेही त्याने सांगितले.