28 January 2021

News Flash

World Cup 2019 : पंचांशी हुज्जत घातल्यामुळे विराट कोहली अडचणीत, होऊ शकते बंदीची कारवाई

कोहलीची पंचांशी हुज्जत

बांगलादेशवर मात करुन भारतीय संघाने २०१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं आव्हान येण्याची शक्यता आहे. मात्र त्या सामन्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अडचणीत येण्याची शक्यता आहे. बांगलादेशिवरुद्ध सामन्यात तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात विराटने मैदानातील पंचांशी हुज्जत घातली. विराटच्या या वागण्यासाठी त्याच्यावर बंदीची शिक्षा घालण्यात येऊ शकते.

१२ व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार पायचीत असल्याचं अपील करण्यात आलं. मैदानावरील पंच मॅरिअर इरास्मस यांनी भारतीयांचं हे अपील फेटाळून लावलं. भारताने याविरोधात तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांच्या पाहणीमध्ये शमीचा चेंडू बॅट आणि पॅडला एकाचवेळी लागल्याचं दिसतं होतं. या कारणामुळे तिसऱ्या पंचांनी भारतीयांचं अपील फेटाळून लावलं. मात्र विराट कोहलीला तिसऱ्या पंचाचा हा निर्णय मान्य नव्हता, म्हणून विराटने पंच मॅरिअस इरास्मस यांच्याशी हुज्जत घातली.

अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यातही विराट कोहलीने वाजवीपेक्षा जास्त अपील केल्यामुळे त्याच्या मानधनातली २५ टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. आयसीसीच्या Article 2.1 Subsection of Level 1 या नियमाचा विराटने भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूकडून या नियमांचा भंग झाल्यास त्याला नकारात्मक गुण दिले जातात. जर दोन वर्षांच्या कालावधीत एका खेळाडूने ४ किंवा त्यापेक्षा जास्त नकारात्मक गुण कमावले तर त्याच्यावर आयसीसीच्या नियमांप्रमाणे बंदीची कारवाई करण्यात येते. बंदीची शिक्षा ही १ कसोटी सामना किंवा २ वन-डे किंवा २ टी-२० सामन्यांसाठी दिली जाऊ शकते.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीला पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. मात्र श्रीलंकेविरुद्ध सामन्यात विराटला आपल्या मैदानातील वागणुकीवर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. श्रीलंकेविरुद्ध सामन्यात विराट कोहलीच्या हातून बांगलादेशविरुद्ध सामन्यातील प्रकाराची पुनरावृत्ती झाली तर त्याला बंदीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 9:35 pm

Web Title: world cup 2019 will indian skipper virat kohli get banned before semifinals psd 91
टॅग Icc,Virat Kohli
Next Stories
1 World Cup 2019 : अखेरच्या सामन्यात विंडीजची अफगाणिस्तानवर मात
2 …तर उपांत्य फेरीत भारतीय संघ पुन्हा भगव्या जर्सीमध्ये दिसणार!
3 विश्वचषकात धोनी फलंदाजीतच नव्हे, यष्टीमागेही अपयशी
Just Now!
X