ICC क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ मंगळवारी रात्री इंग्लंडला रवाना झाला. इतर संघदेखील लवकरच इंग्लंडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर आधी सराव सामने होणार असून त्यानंतर विश्वचषकाचे सामने सुरु होणार आहेत. त्यासाठी अनेक खेळाडू विविध विधानं करताहेत. त्यातच विंडीजचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस गेल याने अजूनही प्रतिस्पर्धी संघ मला घाबरतात असे विधान केले आहे.

ख्रिस गेल

“माझी फलंदाजीची शैली आक्रमक पद्धतीची आहे. पण मी ज्या प्रकारे युवा क्रिकेटपटू असताना फटकेबाजी करायचो तशी फटकेबाजी करणे आता तितके सोपे जाणार नाही. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळी मी अत्यंत चपळ होते. पण आता मात्र तसे असेलच असे नाही. मला खात्री आहे की प्रत्येक संघातील खळाडूंच्या मनात कुठेतरी हा विचार सुरु असणारच की जगातील सगळ्यात धोकादायक फलंदाज या विश्वचषकात खेळणार आह. कारण मी मैदानावर काय करू शकतो? हे सगळ्या संघांना माहिती आहे”, असे गेल म्हणाला.

जर कॅमेरासमोर इतर कोणत्याही संघातील खेळाडूंना तुम्ही विचारलेत तर त्यापैकी एकही जण मला घाबरतो असं म्हणणार नाही. पण कॅमेरा बंद करून अनौपचारिक गप्पा गोष्टी करताना त्यांना हाच प्रश्न विचारला तर मात्र ते नक्कीच माझं नाव घेतील. माझ्या या दहशतीचा मला आनंद आहे. वेगवान गोलंदाजांचा सामना करताना मला मजा येते. मला ते खूप आवडते. जेव्हा तोलामोलाचा खेळाडू गोलंदाजीसाठी येतो, तेव्हा खेळ अधिक रंजक होतो”, असे विधानही गेलने केले.