World Cup 2019 – ICC ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ३० मे पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ तयार होत आहेत. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. पण ख्रिस गेल याच्यासाठी हा विश्वचषक विशेष महत्वाचा आहे. हा गेलचा पाचवा विश्वचषक आहे. या विशेष विश्वचषकाबाबत बोलताना ख्रिस गेलने आपल्या निवृत्तीबाबत खुलासा केला.

“मी हा विश्वचषक केवळ माझ्या चाहत्यांसाठी खेळतो आहे. मी याबाबत अजिबात खोटं बोलणार नाही. कदाचित माझ्या मनात दोन वर्षांपूर्वीच निवृत्ती घेण्याबाबत विचार आला होता. पण मी निवृत्ती घेतली नाही त्याचे कारण म्हणजे माझ्या चाहत्यांनी मला रोखले. चाहत्यांनी माझ्यावर केलेले प्रेम आणि माझ्यावरील विश्वास यामुळेच मी अजूनही क्रिकेट खेळतो आहे आणि म्हणूनच मी त्यावेळी निवृत्ती घेतली नाही”, असा खुलासा गेलने केला.

ख्रिस गेल

 

वेळ फार पटापट निघून जातो. मी कधी स्वप्नातही ५ विश्वचषक स्पर्धा खेळेन असा विचार केला नव्हता. पण मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील पाचवा विश्वचषक खेळणार आहे. माझी कामगिरी सातत्यपूर्ण होती म्हणून मला हे शक्य झाले. माझ्या चांगल्या कामगिरीमुळे माझ्यावर स्तुतीसुमने उधळली गेली. चाहत्यांना माझ्याकडून अजून क्रिकेट पाहायचे आहे, त्यामुळे मला शक्य होईल तेवढ्या वेळ मी सर्वोत्तम कामगिरी करत राहीन”, असेही गेलने स्पष्ट केले.

ख्रिस गेल

 

खेळाडू आणि विंडीज क्रिकेट मंडळ यांच्यावरील वादाबाबतही त्याने भाष्य केले. “आम्ही क्रिकेट मंडळामध्ये गेल्या काही महिन्यांत सकारात्मक बदल पाहिले. कॅरिबियन बेटांवर क्रिकेट हे सर्वात महत्वाचे मानले जाते. आम्हाला अपेक्षा आहे की विंडीजमधील क्रिकेट ज्या स्तरावर असायला हवे होते, तिथपर्यंत क्रिकेटला नेण्याच्या दृष्टीने हे मंडळ प्रयत्न करेल”, असेही गेल म्हणाला.