गौरव जोशी

विश्वचषक आता संपायला आला आहे. सहा आठवडे उलटून गेल्यानंतर पहिल्यांदाच इंग्लंडमधील ‘टाइम्स’, ‘सन’, ‘गार्डियन’ अशा नावाजलेल्या सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर चक्क क्रिकेटचे वर्चस्व दिसू लागले आहे. फुटबॉलच्या मोठय़ा स्पर्धा सुरू नसतानाही या खेळाच्या बातम्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांत दररोज प्रामुख्याने छापून येत होत्या. इंग्लंडमध्येच सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबद्दल येथील वर्तमानपत्रांच्या क्रीडा किंवा शेवटच्या पानावर त्या तुलनेत कमी छापून येत होते; परंतु दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर तेथील लोकांचे क्रिकेटवरील प्रेम आता वाढले आहे.

गेले पाच आठवडे श्रीलंका, बांगलादेश आणि भारतामधील क्रिकेटप्रेमी आपल्या मातृभाषेतील गाणी संघाला प्रोत्साहनासाठी गुणगुणत होते; परंतु गुरुवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान इंग्लिश चाहते त्यांची देशभक्तीपर गीत आणि राष्ट्रगीत प्रत्येक स्टँडमध्ये म्हणताना दिसत होते. विश्वचषकात या सामन्यात प्रथमच इंग्लंडमधील क्रिकेटप्रेम मैदानावर दिसून आले. पूर्वी मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये टीव्ही लावून क्रिकेटचे सामने दाखवायची जाहिरात कधीच करण्यात आली नव्हती, परंतु आता हे वातावरण बदलले आहे.

इंग्लंडने १९९२ नंतर म्हणजेच तब्बल २७ वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे येथील तरुण पिढीने इंग्लंडला अंतिम सामन्यात खेळताना आत्तापर्यंत पाहिलेले नव्हते. उपांत्य फेरीप्रसंगी इंग्लंडच्या चाहत्यांचा जल्लोष मी आत्तापर्यंत कधीच बघितला नव्हता. जेसन रॉय खेळत असताना त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. कारण जिंकण्यासाठी केवळ काही धावांची गरज असताना इंग्लंडच्या संघाकडून काही तरी चूक होऊन ते सामना हरतील, हीच भीती त्यांना वाटत होती; परंतु इंग्लंडने अंतिम फेरी गाठल्यामुळे आता सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले आहे.

रविवारी होणारा अंतिम सामना हा केवळ शुल्क भरावा लागणाऱ्या टीव्ही वाहिन्यांवरच नव्हे, तर बीबीसी ४ आणि चॅनल ४ या वाहिन्यांवर मोफत दाखवला जाणार आहे. त्यामुळे इंग्लंडमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला हा सामना पाहता येणार आहे. सध्या विम्बल्डन टेनिस स्पर्धासुद्धा चालू आहेत. त्यामुळे खूप वर्षांनंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण होईल, की क्रीडारसिकांपुढे विम्बल्डनची अंतिम फेरी पाहावी की इंग्लंडचा विश्वचषकातील अंतिम सामना पाहावा?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) जी तिकिटे विकत घेण्यात आली आहेत, ती भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांनी प्रामुख्याने घेतली आहेत. आता या तिकिटांचे काय करायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. न्यूझीलंडचे समालोचक सायमन डूल यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वर पोस्ट टाकली होती की, ज्या भारतीय किंवा अन्य देशांच्या चाहत्यांकडे अंतिम सामन्याची तिकिटे आहेत, त्यांनी त्यांची पुनर्विक्री करावी. कारण न्यूझीलंडमधील बरेच चाहते लंडनमध्ये नोकरी करतात. इंग्लंडची परिस्थिती वेगळीच आहे. ब्रिटिश तिकीट एजंटचा भारतीय संघाला पाठिंबा होता, परंतु गेल्या ३० वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत असलेल्या लोकांनी भारत आणि पाकिस्तान संघाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या नावाचा शर्ट घातला होता. तो काढून टाकत त्यांनी आता इंग्लंडवरील प्रेम व्यक्त केले आहे.

बऱ्याच भारतीय चाहत्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाचे समर्थन करायचे ठरवले आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक असलेले भारतीय नागरिक म्हणतात, ‘‘आम्ही मूळचे जरी भारतीय असलो तरी इंग्लंडमध्ये गेली ३०-४० वर्षे राहात आहोत म्हणून आम्ही आता इंग्लंडच्या संघाला प्रोत्साहन देणार आहोत.’’ जसे फुटबॉल सामन्याच्या वेळी वातावरण असते, तसेच वातावरण रविवारी होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी निर्माण झाले आहे.

इंग्लंडचा संघ एखादी जागतिक क्रिकेट स्पर्धा जिंकू शकेल, यावर अजूनही तेथील लोकांचा विश्वास बसत नाही आहे. गेल्या चार वर्षांपासून इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्चस्वपूर्ण कामगिरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघाशी इंग्लंडचा लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना होणार आहे; परंतु इंग्लंडमधील लोकांना ते हा सामना जिंकतील की नाही, याबाबत अजूनही शंकाच आहे. त्यांच्या शंकेचे निरसन आता रविवारच्या सामन्याचा निकाल लागल्यावरच होईल.