किएव्ह : जगज्जेत्या फ्रान्सला विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीच्या सलग दुसऱ्या सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. बोस्निया आणि हर्जेगोव्हिनापाठोपाठ युक्रेनने फ्रान्सला १—१ असे बरोबरीत रोखले. डेन्मार्कने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवताना फेरो आयलंडवर १-० अशी मात केली. हा पात्रता फेरीतील डेन्मार्कचा सलग पाचवा विजय ठरला. तसेच हॉलंड आणि नॉर्वे या संघांनाही विजय मिळवण्यात यश आले.

पात्रतेच्या ‘ड’ गटामधील फ्रान्स आणि युक्रेन यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत संपला. मायकोला शापरेन्कोने ४४ व्या मिनिटाला गोल केल्याने या सामन्यात मध्यंतराला युक्रेनकडे १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात फ्रान्सने खेळात सुधारणा केली. ५० व्या मिनिटाला आघाडीच्या फळीतील अँथनी मार्शियालने गोल करत फ्रान्सला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर मात्र युक्रेनचा भक्कम बचाव फ्रान्सला भेदता आला नाही आणि हा सामना बरोबरीतच संपला. फ्रान्सचे पात्रता फेरीत पाच सामन्यांमध्ये नऊ गुण झाले आहेत.

दुसरीकडे, हॉलंडने माँटेनिग्रोचा ४-० असा धुव्वा उडवला. त्यांच्याकडून मेम्फिस डिपेने दोन, तर जिनी वाईनआल्डम आणि कोडी गॅकपोने प्रत्येकी एक गोल केला. तसेच नॉर्वेने लात्व्हियाचा आणि रशियाने सायप्रसचा २-० असा, तर स्कॉटलंडने मोल्दोवाचा आणि क्रोएशियाने स्लोव्हाकियाचा १-० असा पराभव केला.