पुरुषांच्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेची प्रतीक्षा गेली सात वष्रे संपलेली नाही. प्रो-कबड्डी लीग संपत असताना आगामी हंगाम फेब्रुवारी-मार्चमध्ये बहरणार असून, त्यानंतर विश्वचषक कबड्डीही आयोजित करण्यात येणार आहे, असे भारतीय हौशी कबड्डी असोसिएशन आणि स्टार स्पोर्ट्सकडून सांगण्यात येत होते. परंतु आशियाई क्रीडा स्पध्रेतील ताज्या घडामोडींनंतर पुरष आणि महिलांसाठी विश्वचषक कबड्डी स्पर्धा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत या स्पध्रेबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
पुरुषांची पहिली विश्वचषक कबड्डी स्पर्धा २००४मध्ये झाली, तर दुसरी विश्वचषक स्पर्धा २००७मध्ये झाली. याचप्रमाणे महिलांची विश्वचषक स्पर्धा २०१२मध्ये झाली होती. या सर्वच विश्वचषक स्पर्धामध्ये अर्थात भारताने विजेतेपद पटकावले होते. परंतु पुरुषांच्या विश्वचषक कबड्डी स्पध्रेला गेली अनेक वष्रे मुहूर्त मिळत नव्हता.
आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्ये आता डीआरएस
क्रिकेट क्षेत्रात पंच पुनर्आढावा प्रक्रिया (डीआरएस) अद्याप सर्व संघांनी स्वीकारलेली नाही. भारतीय क्रिकेटचा डीआरएसला असलेला विरोध सर्वश्रुतच आहे. परंतु कबड्डीने मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर डीआरएसचा स्वीकार केला आहे. त्यामुळे प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रत्येक संघाला दोनदा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागता येणार आहे, अशी माहिती भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख ई. प्रसाद राव यांनी दिली.
इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेदरम्यान आशियाई हौशी कबड्डी महासंघ आणि आंतरराष्ट्रीय हौशी कबड्डी महासंघ यांच्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‘‘प्रो-कबड्डी लीगच्या बाद फेरीच्या चार सामन्यांमध्ये आम्ही डीआरएसचा प्रयोग केला होता आणि तो यशस्वी झाला होता. त्यामुळेच या नियमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मंजुरी देण्यात आली,’’ असे राव यांनी पुढे सांगितले.
याचप्रमाणे तीस सेकंदाचे चढाईला बंधन घालण्यात आले आणि तीनपेक्षा कमी खेळाडू असताना चढाईपटूने पकड केल्यास ‘सुपर कॅच’चा अतिरिक्त गुण यापुढे संघाला मिळणार आहे. प्रो-कबड्डी लीगच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे नियम आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डीमध्ये दिसणार आहेत.