सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे क्रिकेटचाहत्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता विश्वचषकाचे सामने दूरदर्शनवर पाहता येणार आहेत.
दूरदर्शनवर सामने प्रसारित झाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते अशी भूमिका घेत बीसीसीआय आणि प्रक्षेपण वाहिनी स्टार समूहाने न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली न्यायालयाने बीसीसीआय आणि स्टार समूहाच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर प्रसारभारतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. दूरदर्शन विनाशुल्क फीड वापरत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागते अशी भूमिका स्टारने पुन्हा एकदा मांडली. मात्र गेल्या सात वर्षांपासून दूरदर्शन थेट प्रक्षेपणाचे फीड वापरत आहे. प्रक्षेपण असेच सुरू राहावे असा निर्णय न्यायामूर्ती रंजन गोगोई आणि पिनाकी चंद्रा घोष यांच्या खंडपीठाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने स्टार समूहाला या संदर्भात सूचना देण्यास सांगण्यात आले असून, त्यासंबंधी १७ फेब्रुवारीला सुनावणी होईल. खाजगी वाहिन्यांवर विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. मात्र या निर्णयामुळे चाहत्यांना फ्री टू एअर असणाऱ्या दूरदर्शनवर विश्वचषक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.