विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा :- ओमानकडून १-० अशा पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे भारतीय फुटबॉल संघाचे फिफा विश्वचषक स्पर्धेत मजल मारण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. फिफा विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेत भारताची विजयाची पाटी अद्यापही कोरीच आहे.

मोहसिन अल घसानी याने ३३व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलमुळे ओमानने भारताचा पराभव केला. सप्टेंबरमध्ये गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ओमानने भारताला २-१ अशी धूळ चारली आहे.

ओमानने या विजयासह ई गटात १२ गुणांसह दुसरे स्थान कायम राखले असून कतार १३ गुणांसह अग्रस्थानी आहे. भारतीय संघ मात्र तीन बरोबरी आणि दोन पराभवांसह तीन गुणांनिशी चौथ्या क्रमांकावर कायम आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी संघात तीन बदल करत मनवीर सिंग, फारूख चौधरी आणि निशू कुमार यांना संधी दिली होती. भारताला सातव्या मिनिटालाच गोलची नामुष्की पत्करावी लागणार होती. पण मोहसिन घसानी याने पेनल्टीवर मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. आदिल खान आणि प्रणॉय हल्देर या भारताच्या खेळाडूंना पंचांनी पिवळे कार्ड दाखवले.

राहुल भेके याने ओमानच्या बचावपटूला गोलक्षेत्रात पाडल्याप्रकरणी ओमानला स्पॉटकिक मिळाली. यावर मोहसिन याने कोणताही चूक न करता भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याला चकवून गोलशून्यची कोंडी फोडली. यजमान संघाने गोल केल्यानंतर खच्चाखच भरलेल्या स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

पहिल्या सत्रात ओमानने चेंडूवर अधिकाधिक वेळ ताबा मिळवून वर्चस्व गाजवले. २७व्या मिनिटाला अहमद अल काबी याने हेडरद्वारे मारलेला फटका गोलजाळ्याच्या वरून गेला. दुसऱ्या सत्रात भारताने चांगला खेळ केला, पण चेंडूला गोलजाळ्याच्या दिशा दाखवण्यात भारताला अपयश आले. आता भारताचे पुढील तीन सामने पुढील वर्षी कतार (२६ मार्च), बांगलादेश (४ जून) आणि अफगाणिस्तान (९ जून) या संघांविरुद्ध होतील.