माईल जेडीनॅकची हॅट्ट्रिक; होंडुरासवर मात

कर्णधार माईल जेडीनॅकच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बुधवारी विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पध्रेत होंडुरासवर ३-१ असा विजय मिळवला. या विजयासह त्यांनी २०१८ मध्ये रशियात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे तिकीट निश्चित केले. ऑस्ट्रेलियाने सलग चौथ्यांदा विश्वचषक स्पध्रेच्या पात्रतेचा निकष पूर्ण केला आहे.

या लढतीत पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले, त्यामुळे प्रेक्षक निराश वाटत होते. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाने दुसरे सत्र गाजवले. ५३व्या मिनिटाला फ्री किकवर जेडीनॅकने ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा  खेळ उंचावला. पहिल्या सामन्यात गोलशून्य बरोबरीनंतर परतीच्या सामन्यात घरच्या प्रेक्षकांसमोर ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी केली. ७२व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉट किकवर जेडीनॅकने ऑस्ट्रेलियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यात ८७व्या मिनिटाला गोल करत जेडीनॅकने हॅट्ट्रिकसह ऑस्ट्रेलियाच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. जेडीनॅकने तिसरा गोल पेनल्टी स्पॉट किकवर केला. होंडुरासने अखेरच्या मिनिटापर्यंत पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना एका गोलवर समाधान मानावे लागले. इलिसने भरपाई वेळेत हा गोलकेला, पंरतु होंडुरासचे विश्वचषक स्पध्रेत खेळण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

आठ वर्षांनी डेन्मार्कचा प्रवेश

डेन्मार्कने २०१० नंतर विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित केली आहे. बुधवारी झालेल्या पात्रता लढतीत त्यांनी आर्यलडवर ५-१ अशा फरकाने मात केली.

हॅट्ट्रिक नोंदवणारा ख्रिस्टियन एरिक्सेन हा या विजयाचा नायक ठरला. त्याला ए. ख्रिस्टनसेन आणि एन. बेन डॅटनेर यांनी प्रत्येकी एक गोल करून साथ दिली. आर्यलडकडून एस. डफीने एकमेव गोल केला.