विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा

आतापर्यंत कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे भारतीय फुटबॉल संघाला ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाही. आता गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या महत्त्वपूर्ण लढतीत भारताला आपले आव्हान कायम राखण्यासाठी विजय अनिवार्य आहे.

पात्रता स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या ओमानकडून १-२ अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर भारतीय संघाने दोहा येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या सामन्यात आशियाई विजेत्या कतारला गोलशून्य बरोबरीत रोखले. या दोन सामन्यांत चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या फेरीत मजल मारेल, अशी आशा निर्माण झाली होती; पण कोलकाता येथे १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही भारताला १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली.

कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आदिल खान याने ८८व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करून भारताला बरोबरी साधून दिली असली तरी घरच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली. भारतीय संघ ई-गटात तीन सामन्यांत दोन गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पाच जणांच्या या गटातून अव्वल दोन संघ तिसऱ्या फेरीत मजल मारणार असल्यामुळे भारताला अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत होणे परवडण्यासारखे नाही.

मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा भारतीय संघ ‘फिफा’ क्रमवारीत १०६व्या स्थानी असून अफगाणिस्तान १४९व्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानने एक विजय आणि दोन पराभवांसह तीन गुणांनिशी गटात तिसरे स्थान पटकावले आहे. अफगाणिस्तानच्या घरच्या मैदानावर होणारा हा सामना दुशानबे येथे खेळवण्याचा निर्णय यजमान संघाने घेतला आहे. अतिशय थंड वातावरणात हा सामना कृत्रिम मैदानावर होत आहे.

‘‘बांगलादेशविरुद्ध गोल करण्याच्या संधी निर्माण करूनही आम्हाला यश मिळाले नाही. आता त्या कामगिरीची पुनरावृत्ती करून चालणार नाही. बचावात चांगली कामगिरी करून आम्हाला संधीचे सोने करावे लागेल,’’ असे भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने सांगितले. आईचे निधन झाल्यामुळे मध्यरक्षक अनास इडाथोडिका दुबईहून मायदेशी परतल्यामुळे भारताला सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे. तसेच बचावपटू रोवलिन बोर्गेस दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.

सामन्याची वेळ : सायं. ७.०० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

पुढे काय होणार?

भारताला तिसऱ्या फेरीत मजल मारण्यासाठी आपल्या ‘ई’ गटात किमान दुसरे स्थान पटकावणे गरजेचे आहे. तिसऱ्या फेरीतून १० पैकी पाच संघ फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. ‘ई’ गटातील कतारने पहिल्या दोन स्थानांवर मजल मारली तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला तिसऱ्या फेरीत आगेकूच करण्याची संधी मिळेल. भारत मात्र सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारताला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढील सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.

भारताने नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे; पण आता त्यापुढेही जात आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. येथील तापमान जवळपास शून्य अंश सेल्सियस इतके असले तरी खेळ उंचवावा लागणार आहे. अफगाणिस्तानने कृत्रिम हिरवळीवर हा सामना खेळवण्याचा निर्णय घेऊन आम्हाला संकटात टाकले आहे. भारतीय खेळाडूंना या मैदानावर खेळण्याचा अनुभव नाही. तरीही विजयश्री खेचून आणण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल.

– इगोर स्टिमॅक, भारताचे मुख्य प्रशिक्षक