९०व्या मिनिटाला विजयी गोल; मॅकेडोनियावर मात

किरो इमोबिलेने भरपाई वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर चार वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या इटलीने रशियात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या पात्रता फेरीत एफवायआर मॅकेडोनियावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. इमोबिलेच्या या गोलने इटलीची पात्रता स्पध्रेतील नाचक्की टाळली. इटलीने विजय मिळवला असला तरी स्पेनच्या अल्बानियावरील २-० अशा विजयामुळे त्यांना ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

इटली आणि मॅकेडोनिया यांच्यातील लढतीत अँड्रीया बेलोट्टीने २४व्या मिनिटाला माजी विजेत्यांना १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात इटलीने ही आघाडी कायम राखली, परंतु मध्यंतरानंतर मॅकेडोनियाने जोरदार पलटवार केला. इलिजा नेस्टोरोकव्हस्की (५७ मि.)आणि फेरहान हसानी (५९ मि.) यांनी दोन मिनिटांत दोन गोल करत मॅकेडोनियाला २-१ अशा आघाडीवर आणले. त्यामुळे इटलीच्या चमूत तणावाचे वातावरण होते. व्हेराट्टी आणि अँटोनिओ कँड्रेव्हा यांनी अप्रतिम जुगलबंदी करून मॅकेडोनियाची बचावफळी खिळखिळी केली. त्यावर इमोबिलेने (७५ मि.) गोल करून इटलीला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. भरपाई वेळेत सामन्याची उत्कंठा शिगेला पोहचली होती, मॅकेडोनिया माजी विजेत्यांना बरोबरीत रोखण्यात यशस्वी होतील, अशीच चिन्हे होती. मात्र, कॅनड्रेव्हाच्या क्रॉसवर इमोबिलेने गोल करून इटलीचा बचाव केला. तत्पूर्वी, इटलीच्या मार्को पॅरोलोने हेडरद्वारे केलेला गोल ऑफ साइड म्हणून पंचांनी नाकारला.

‘‘आम्ही कमकुवत खेळ केला आणि मध्यंतरानंतर गाफील राहिलो. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा गाफीलपणा अंगलट येऊ शकतो. आम्हाला अधिक कठोरपणे खेळायला हवे,’’ असे इमोबिले म्हणाला.

इतर निकाल

  • स्पेन २ (डिएगो कोस्टा ५५ मि. व नोलिट्टो ६३ मि.) वि. वि. अल्बानिया ०.
  • फिनलँड ० पराभूत वि. क्रोएशिया १ (मारियो मॅन्झुकिस १८ मि.).
  • युक्रेन ३ (अ‍ॅर्टेम क्रॅव्हेट्स ३१ मि., ए. यार्मोलेंको ८१ मि. व आर. रोटन ८७ मि.) वि. वि. कोसोव्हो ०.