न्यूझीलंडमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बांगलादेशचे क्रिकेटपटू थोडक्यात बचावले असून विश्वचषक स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी स्पष्ट केले.

ख्राइस्टचर्च येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. गोळीबाराला सुरुवात झाली तेव्हा बांगलादेशच्या क्रिकेटपटूंची बस काही मिनिटांच्या अंतरावर होती. या घटनेमुळे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना तात्काळ रद्द करण्यात आला असून बांगलादेशचे खेळाडू मायदेशी परतले आहेत.

पाकिस्तान सुपर लीगच्या अंतिम फेरीच्या पार्श्वभूमीवर रिचर्डसन यांनी सुरक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही सुरक्षाव्यवस्थेत आणखीन वाढ करू. सुरक्षा संचालकांनी ब्रिटनमधील सर्व सुरक्षा यंत्रणांना हाताशी धरत याआधीच सुरक्षाव्यवस्थेबाबतीत काम सुरू केले आहे.’’ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या वतीने ३० मे ते १४ जुलै या कालावधीत विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.