News Flash

तेजस्विनी-संजीव यांना सुवर्णपदक

१२ सुवर्णपदकांसह भारताची अग्रस्थानी मजल

(संग्रहित छायाचित्र)

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

महाराष्ट्राची तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत या अनुभवी नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताने सुवर्णपदकाची भर घातल्यानंतर विजयवीर सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. यासह भारताने १२ सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह एकूण २७ पदकांनिशी अग्रस्थानी मजल मारली आहे.

सुवर्णपदकासाठी रंगलेल्या अंतिम लढतीत भारताच्या या जोडीने युक्रेनच्या सेरहिय कुलिश आणि अ‍ॅना इलिना यांच्यावर ३१-२९ असा थरारक विजय मिळवला. तेजस्विनी-संजीव यांनी आपला अनेक वर्षांचा अनुभव पणाला लावत हे सुवर्णपदक खेचून आणले. यासह भारताची सुवर्णपदकांची संख्या ११वर पोहोचली आहे. भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि सुनिधी चौहान यांनी अमेरिकेच्या टिमोथी शेरी आणि विर्जिनिया थ्रॅशर यांच्यावर ३१-१५ अशी सहज मात करत कांस्यपदक पटकावले.

अंतिम लढतीत तेजस्विनी-संजीव यांची सुरुवात निराशाजनक झाली होती. मात्र १-३ असे पिछाडीवर पडल्यानंतरही त्यांनी ५-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी कायम टिकवत जेतेपद पटकावले. युक्रेनच्या जोडीने बरोबरी साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण भारताच्या अनुभवी जोडीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. पात्रता फेरीत भारताच्या जोडीने सर्वाधिक ५८८ गुण मिळवले होते. तर कुलिश आणि इलिनाने ५८३ आणि तोमर-चोहान यांनी ५८० गुण पटकावले होते.

भारतीय पुरुषांना सांघिक सुवर्ण

नीरज कुमार, स्वप्निल कुसळे आणि चेन सिंग यांनी भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताच्या जोडीने अमेरिकेचा ४७-२५ असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावले. कुमार-कुसळे-सिंग यांनी अमेरिकेच्या निकोलस मोवरेर, टिमोथी शेरी आणि पॅट्रिक सुंदरमन यांच्यावर सहज मात केली.

विजयवीर सिंधूला रौप्यपदक

भारताच्या विजयवीर सिंधू याला पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात इस्टोनियाच्या पीटर ओलेस्क याच्याकडून हार पत्करावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ४०पैकी दोघांनी प्रत्येकी २६ वेळा अचूक लक्ष्यवेध केला होता. पण शूट-ऑफमध्ये त्याला कामगिरी उंचावता आली नाही. भारताच्या अनिश भानवाला आणि गुरप्रीत सिंग यांना अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

पदकतालिका

क्र. देश सुवर्ण   रौप्य      कांस्य    एकूण

१.  भारत   १२ ८  ७  २७

२.  रशिया  ५  ३  १  ९

३.  अमेरिका ३  ३  १  ७

४.   डेन्मार्क २  १  १  ४

५.  क्रोएशिया   २  ०  ०  २

अंतिम फेरीत मी शैलीत काहीसे बदल केले. त्यामुळे आता सुधारणेला खूप वाव आहे. तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करत आहे.

– संजीव राजपूत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:16 am

Web Title: world cup shooting competition india tops the list with 12 gold medals abn 97
Next Stories
1 सायना उपांत्य फेरीत
2 ग्रँडमास्टर लेऑन मेंडोसाला जेतेपद
3 धावांच्या पावसात भारताची होरपळ!
Just Now!
X