भारताच्या विजयवीर-तेजस्विनी यांना सुवर्णपदक

विजयवीर सिधू आणि तेजस्विनी या युवा नेमबाजांनी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. सुवर्णपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात तेजस्विनी-विजयवीर यांनी भारताच्याच गुरप्रीत सिंग आणि अभिज्ञा अशोक पाटील यांच्यावर ९-१ अशा फरकाने मात केली. डॉ. कर्णी नेमबाजी केंद्रात रंगलेल्या या लढतीच्या पात्रता फेरीत गुरप्रीत-अभिज्ञा जोडीने सर्वाधिक ३७० गुण मिळवले होते. तेजस्विनी-विजयवीर यांना ३६८ गुण मिळवता आले होते.

विजयवीर याने शुक्रवारी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर आता त्याने थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. यामुळे भारताने १३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह एकूण २७ पदकांसह आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले.

कायनन-श्रेयसीचे पदक हुकले

कायनन चेनाय आणि श्रेयसी सिंग यांना ट्रॅप गटाच्या मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. भारतीय संघाला कांस्यपदकासाठी झालेल्या या लढतीत तुर्कीच्या साफिये सारितुर्क आणि यावूझ इलनाम यांनी ३५-३८ असे पराभूत केले. कायनन याला वैयक्तिक प्रकारातही चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. या दोघांची सुरुवात खराब झाली असली तरी नंतर त्यांनी कामगिरीत सुधारणा केली. श्रेयसीला अनेक वेळा अचूक लक्ष्यवेध करता आला नाही. भारताच्या या जोडीची पात्रता फेरीतही १४१ गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरण झाली होती. इटलीच्या अलेसिया लेझ्झी आणि व्हॅलेरियो ग्रॅझिनी यांनी सुवर्णपदक पटकावले.