मुंबईच्या वानखेडे मैदानावर २०११ साली कर्णधार महेंद्रसिंग धोनीने उत्तुंग षटकार लगावत भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकवून दिला. डावखुरा फलंदाज गौतम गंभीर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या मोठ्या खेळींच्या बळावर भारताने २८ वर्षांनी विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. या विजयानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारतीय युवा खेळाडू खांद्यावर घेऊन नाचले. सचिनसोबत आणखी व्यक्तीला त्या दिवशी खेळाडूंनी खांद्यावर उचलून घेतले होते. ते म्हणजे भारताचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन… नुकतीच त्यांनी एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी टीम इंडियासोबतचा आणि खेळाडूंसोबतचा अनुभव सांगितला.

“मला टीम इंडियामध्ये सर्वात सहजतेने सचिनसोबत काम करता आलं. सचिनवरील संस्कार आणि मुल्यांचे शिक्षण यामुळे मला सचिनसोबत काम करायला अजिबात समस्या उद्भवली नाही. २०११ मध्ये मी नवख्या विराटला पाहिलं होतं. तेव्हाच मला त्याच्या खेळीत उज्ज्वल भविष्य दिसलं होतं आणि आता तो खरंच दिग्गज खेळाडू आहे. भारतीय संघाला प्रशिक्षण देताना मला खूपच आनंद झाला. मला त्या संघाला मार्गदर्शन करायला मिळालं हे माझं भाग्य होतं आणि मला त्याचा अभिमान आहे. भारताच्या सर्व खेळाडूंकडून विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा केली जात होती आणि त्यांनी ती अपेक्षा पूर्ण केली. तो प्रवास खूपच सुखदायक होता”, असे कर्स्टन म्हणाले.

धोनीबद्दलही मांडलं मत

“महेंद्रसिंग धोनी हा खूपच अफलातून क्रिकेटपटू आहे. त्याची हुशारी, शांत स्वभाव, विचारशक्तीचं सामर्थ्य, तंदुरूस्ती, चपळता आणि सामना जिंकवून देण्याची जिद्द अशा विविध गुणांमुळे तो इतर खेळाडूंपेक्षा वेगळा आहे. त्याच या गुणांमुळेच तो आधुनिक क्रिकेटमधील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. निवृत्ती कधी स्वीकारावी याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याने स्वत:च्या कर्तृत्वावर मिळवला आहे. इतर कोणीही त्याला सल्ले देऊ नयेत”, असेही कर्स्टन यांनी स्पष्ट केले.