टायलर लोवेलचा अभेद्य बचाव आणि भारताकडून आकाश चिकटे आणि सुरज करकेरा जोडीने केलेला आश्वासक खेळ या जोरावर वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-१ अशा बरोबरीत रोखलं. संपूर्ण सामन्यात भारताने आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला चांगली टक्कर दिली. मात्र निर्णायक आघाडी घेण्यात भारत तसेच ऑस्ट्रेलिया या दोनही संघांना अपयश आल्याने हा सामना अखेर बरोबरीत सुटला.

ओडीशातील भुवनेश्वर शहरात सुरु असलेल्या वर्ल्ड हॉकीलीग स्पर्धेत भारताने पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळाला सुरुवात केली. भारताच्या आघाडीच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन गोलपोस्टवर लागोपाठ २ ते ३ आक्रमणं केली. मात्र ऑस्ट्रेलियन गोलकिपर टायलर लोवेलने भारतीयांचे सगळे हल्ले परतवून लावले. भारतीय संघाचा हा आक्रमक बाणा ऑस्ट्रेलियासाठी नवीन होता. मात्र यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सामन्यावर पकड घेत भारताला बॅकफूटलला ढकलण्यास सुरुवात केली. मात्र पी. आर. श्रीजेशच्या अनुपस्थितीत बचावाची धुरा सांभाळणाऱ्या महाराष्ट्राच्या आकाश चिकटेने भारतीय गोलपोस्टचा उत्तम बचाव केला. अखेर भारतीय कर्णधार मनप्रीत सिंहने ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या ताब्यातला बॉल हिसकावून घेत मनदीप सिंहकले लाँग पास दिला. यावेळी मनदीपने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत, टायलर लोवेलचा बचाव भेदून बॉल गोलपोस्टमध्ये ढकलला.

११ व्या मिनीटाला भारताकडे सामन्यात १-० अशी आघाडी होती. मात्र भारताचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. २१ व्या मिनीटाला जेमी हेवर्डने पेनल्टी कॉर्नवर गोल करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात १-१ अशी आघाडी मिळवून दिली. आकाश चिकटेच्या डाव्या बाजूने बॉल गोलपोस्टमध्ये ढकलण्यात हेवर्डला यश आलं. यानंतर मध्यांतरापर्यंत दोनही संघांनी सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही यामध्ये यश आलं नाही.

मध्यांतरापर्यंत गोलपोस्टवरची कोंडी न फुटल्यामुळे तिसऱ्या सत्रात दोनही संघ आघाडी घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असा अंदाज सर्वांनी वर्तवला होता. याप्रमाणे दोनही संघातल्या खेळाडूंनी जोरदार आक्रमणं करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाही, मात्र गोल करण्यात कोणत्याही खेळाडूला यश आलं नाही. त्यातच तिसऱ्या सत्रात रुपिंदरपाल सिंहने पेनल्टी कॉर्नरसाठी तिसऱ्या पंचांकडे मागितलेला रिव्ह्यू वाया गेला. यानंतर तिसऱ्या सत्रात बचावफळीच्या गलथान खेळामुळे ऑस्ट्रेलियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र मिळालेल्या संघीचं गोलमध्ये रुपांतर करणं त्यांना जमलं नाही.

चौथ्या सत्रात सामना संपण्यासाठी सहा मिनीटांचा खेळ शिल्लक असताना, भारतीय खेळाडूला धक्का दिल्याप्रकरणी पंचांनी भारताला पेनल्टी कॉर्नर बहाल केला. मात्र बिरेंद्र लाक्राच्या पकडीत बॉल न आल्याने भारताने सलग चौथी संधी वाया घालवली. पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर न करता येणं ही भारतीय संघाची जुनी डोकेदुखी आहे. या सामन्यातही याचा प्रत्यय आला. भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी रुपिंदरपाल सिंह ऐवजी संघातील तरुण ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीतला संधी दिली, मात्र त्याला गोल करण्यात अपयश आलं. शेवटच्या क्षणांमध्ये भारताकडे गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण झालेल्या होत्या, मात्र बॉलवर ताबा ठेवण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आल्याने अखेर हा सामना १-१ अशा बरोबरीत सुटला.