भारतीय महिलांनी जागतिक हॉकी लीगमधील शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळली. त्यांनी चिली संघावर २-१ असा विजय नोंदवत सातवे स्थान पटकाविले.
चिलीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी भारताला झगडावे लागले. ४४व्या मिनिटाला कॅमिला कॅरोमने पेनल्टी-कॉर्नरद्वारा गोल करत चिलीला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर तीन मिनिटांनी भारताच्या रितुशा राणी आर्य हिने लिलिमा मिंझ हिच्या पासवर गोल करत बरोबरी साधली. तिने सुरेख फटका मारून चिलीची गोलरक्षक क्लाऊडिया शुलर हिला चकविले. चंचना देवी थोकचोमने ५६व्या मिनिटाला भारताचा विजयी गोल केला.
पुरुष गटात भारतापुढे आज स्पेनचे आव्हान
आगामी विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला पुरुष गटात रविवारी स्पेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हा सामना जिंकल्यास भारत पाचव्या स्थानी झेप घेईल.