प्रिती दुबेच्या एकमेव गोलच्या आधारावर भारतीय महिला हॉकी संघाने वर्ल्ड हॉकीलीगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. चिलीवर भारतीय संघाने १-० अशी मात केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर अमेरिकेविरुद्ध भारताला १-४ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंत भारताला चिलीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं होतं.

या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या समान संधी मिळाल्या. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. मात्र दोन्ही संघ त्या पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या सत्रात चिलीच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या काही सुरेख संधी निर्माण केल्या. मात्र भारतीय बचावपटूंनी कसाबसा हा हल्ला रोखल्यामुळे भारतावरचं संकट टळलं.

अखेर गोलपोस्टवरची ही कोंडी फोडण्यात भारताच्या प्रिती दुबेला यश आलं. राणी आणि प्रितीने सुरेख चाल रचत चिलीच्या पेनल्टी एरियात प्रवेश केला, आणि प्रिती दुबेने फिनीशींग टच देण्याचं काम करत भारताला आघाडी मिळवून देण्याचं काम केलं. यानंतर भारतीय खेळाडूंच्या खेळात थोडा आक्रमकपणा जाणवायला लागला. पहिला गोल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पुन्हा चिलीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. भारतीय महिलांचा पुढील सामना अर्जेंटीनाच्या महिला संघासोबत १६ जुलैला होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय महिलांचा संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.