जागतिक हॉकी लीग स्पर्धा
भारतीय महिला हॉकी संघाला जागतिक हॉकी लीग स्पर्धेत हॉलंड विरुद्धच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताचा ८-१ अशा मोठ्या फरकाने पराभव झाला. या पराभवामुळे उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याच्या शर्यतीतून भारत बाहेर पडला आहे. सामन्याची सुरुवात भारताच्या बाजूने झाली होती. संघ सावधगिरीने खेळत होता. हॉलंड संघाला थोपवून ठेवण्यात भारताला यश आले होते. पहिला गोल करण्यास हॉलंडला २१ मिनिटे लागली. सामन्याच्या मध्यांतरानंतर हॉलंडची कर्णधार मार्जे पाउमेनने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत हॉलंडच्या गुणसंख्येत वाढ केली. भारतीय संघ हॉलंडवर आक्रमक खेळी करत होता परंतु, गोल करण्यास यश येत नव्हते. अखेर सामन्याच्या ४८व्या मिनिटाला भारताची वंदना कटारियाने गोल करत भारतीय संघाच्या गुणसंख्येचे खाते उघडले.
त्यानंतर हॉलंडने आक्रमक खेळी करत गोल करण्यास सुरुवात केली. एका मागोमाग एक गोल करत हॉलंडने भारताला सामन्यात पुन्हा गोल कऱण्यास संधीच दिली नाही आणि सामन्याच्या अखेरीस हॉलंडने भारतावर मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला. या पराभवामुळे उपांत्यफेरीत भारताला प्रवेश मिळण्याच्या आशेला पुर्णविराम मिळाला आहे.