सुमारे तीन दशकांपूर्वी फिलिपाइन्सला झालेल्या ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पध्रेच्या रूपाने विश्वनाथन आनंदने आपल्या बुद्धिबळ कारकिर्दीतील पहिली जागतिक मोहोर उमटवली होती. काही वर्षांनी याच आनंदने जागतिक बुद्धिबळ क्षेत्रावर राज्य करताना पाच वेळा विश्व अजिंक्यपद किताब जिंकला आणि खऱ्या अर्थाने ‘विश्वनाथ’ या नावाला जागला. शनिवारी मुंबईत झालेल्या ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पध्रेच्या पत्रकार परिषदेप्रसंगी भूतकाळातील आठवणींनी आनंद भारावला.
‘‘बोरिस स्पास्की, अनातोली कारपोव्ह, गॅरी कास्पारोव्ह आणि मी विश्वविजेतेपद जिंकण्यापूर्वी आधी ज्युनिअर विश्वविजेते झालो होतो. १९८७मध्ये मी ज्युनिअर विश्वविजेतेपद पटकावले होते. तेथूनच माझा प्रवास सुरू झाला. पुण्यात होणाऱ्या ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पध्रेत दिग्गज खेळाडूंचा चुरशीचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. भारताची मदार असेल ती विनीत गुजराथीवर. त्याला मागील स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. परंतु नुकतेच त्याने अर्मेनियाला झालेल्या प्रतिष्ठेच्या स्पध्रेतील विजेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्याच्याकडून मोठय़ा आशा असतील,’’ असे ४४ वर्षीय आनंदने सांगितले. आनंद हा या स्पध्रेचा सदिच्छादूत आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये चेन्नईत झालेल्या विश्व अजिंक्यपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसन विजेता ठरला होता. आता यावर्षी आपले जगज्जेतेपद कार्लसनकडून पुन्हा मिळवण्यासाठी आनंद तयारी करीत आहे.
जगज्जेतेपदाची लढत सोचीला होऊ शकेल -आनंद
विश्वविजेता मॅग्नस कार्लसन आणि माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद यांच्यातील विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेची लढत पुढे ढकलली जाण्याची शक्यता होती. परंतु ही लढत नोव्हेंबर महिन्यात रशियातील सोची येथे होऊ शकेल, अशी आशा आनंदने प्रकट केली. ‘‘सध्या तरी सोचीचा विश्वविजेतेपदाच्या लढतीच्या यजमानपदाचा प्रस्ताव आला आहे. परंतु हा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग असावा,’’ असे मत आनंदने व्यक्त केले. नॉर्वेला ११ ऑगस्टला फिडेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत माजी विश्वविजेता गॅरी कास्पारोव्ह व सध्याचे अध्यक्ष किरसान युमझिनोव्ह यांच्यात लढत होणार आहे.
ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा ऑक्टोबरमध्ये पुण्यात
पुण्यात ५ ते २० ऑक्टोबर या कालावधीत ज्युनिअर (२० वर्षांखालील) विश्व अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पध्रेत ६५ देशांचे २५० खेळाडू सहभागी होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली. या वेळी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे उपस्थित होते. स्विस लीग पद्धतीने चालणाऱ्या १३ फेऱ्यांच्या या स्पध्रेतील विजेत्याला सहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
 मुख्यमंत्र्यांच्या ‘बुद्धिबळा’ने आनंदला आश्चर्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शुक्रवारी सायंकाळी विश्वनाथन आनंद आणि बुद्धिबळ क्षेत्रातील काही प्रशासकांनी भेट घेतली. या वेळी राज्य सरकारने या स्पध्रेला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. याचप्रमाणे स्पध्रेचे पालकत्व स्वीकारले. या भेटीप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आनंदला त्याचे एलो रेटिंग विचारले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा बुद्धिबळातील ज्ञान आणि रस पाहून मला आश्चर्य वाटले, असे आनंदने सांगितले.