27 January 2021

News Flash

जागतिक मल्लखांब स्पर्धा ध्वनिक्षेपकाशिवाय! 

राज्य सरकारच्या विरोधानंतर न्यायालयाने परवानगी नाकारली

राज्य सरकारच्या विरोधानंतर न्यायालयाने परवानगी नाकारली

मुंबई : मुंबईतील शिवाजी पार्क येथे पुढील आठवडय़ात होणाऱ्या पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. राज्य सरकारच्या विरोधानंतर न्यायालयाने आयोजकांना ध्वनिक्षेपक वापरू देण्यास परवानगी नाकारली.

जागतिक मल्लखांब संघटना आणि दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरने स्पर्धेसाठी ध्वनिक्षेपक वापरू देण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत शिवाजी पार्क हे शांतताक्षेत्र आहे.

त्यामुळे तेथे ध्वनिक्षेपक लावण्यास मज्जाव आहे, असे सांगत राज्य सरकारने याचिकाकर्त्यांच्या मागणीला विरोध केला. राज्य सरकारचा हा विरोध योग्य ठरवत न्यायालयाने स्पर्धेदरम्यान ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी नाकारली.

१५ देशांचा सहभाग

मुंबईतील शिवाजी पार्कवर येत्या १६ आणि १७ फेब्रुवारीला जागतिक मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ व्यायामशाळेच्या माध्यमातून होणाऱ्या या स्पर्धेसाठी जगातील १५ देशांमधील १५० मल्लखांबपटू मुले आणि मुली सहभागी होणार आहेत.

मल्लखांब हा खेळ केवळ महाराष्ट्रातच तुरळक प्रमाणात खेळला जातो, या गैरसमजाला छेद देण्याच्या इराद्याने दादरच्या समर्थ व्यायाम मंडळाने शिवाजी पार्कवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जगातील अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, स्पेन, चेक प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया, इराण, बांगलादेश आणि भारत या देशांतील प्रत्येकी सहा खेळाडूंना त्यांचा खेळ दाखवण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे.

जागतिक स्पर्धा सुसज्ज अशा वातानुकूलित तंबूमध्ये होणार आहे. मल्लखांबप्रेमी नागरिकांना यानिमित्ताने या स्पर्धा पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मल्लखांब हा महाराष्ट्राच्या मातीतून पूर्ण देशभरात पोहोचलेला खेळ आहे. कोरियाने ज्याप्रमाणे तायक्वांदो, चीनने वुशू तर मलेशियासारख्या देशाने सेपक टकरा खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले, त्याप्रमाणेच भारताचा मल्लखांब खेळ जगभरात पोहोचवण्याचा आयोजकांचा ध्यास आहे.

निम्म्याहून कमी निधी संकलनामुळे आव्हान

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण व्यवस्था आणि अन्य साधनसुविधांसाठी सुमारे एक कोटी ७३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी विविध संस्था आणि मान्यवरांच्या माध्यमातून आयोजकांनी ६० लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. स्पर्धा आठवडय़ावर आलेली असूनही आयोजक निधीसाठी वणवण करीत असल्याने स्पर्धेचे दर्जेदार आयोजन हा आयोजकांसमोर यक्षप्रश्न ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2019 5:16 am

Web Title: world mallakham tournament in mumbai shivaji park
Next Stories
1 ५० कोटींचा ‘सिंधू करार’!
2 इराणी चषकासाठी शेष भारत संघाची घोषणा, अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्व
3 IND v NZ : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईकरांचा बोलबाला
Just Now!
X