जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला ली चोंग वेई प्रतिबंधित उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे जागतिक बॅडमिंटन संघटनेने तात्पुरती बंदी घातली आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत ली दोषी आढळला होता. जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या उत्तेजकांसंदर्भातील समिती लीबाबत निर्णय घेईल आणि त्यानंतर त्याच्या शिक्षेचे स्वरूप निश्चित होईल. या समितीच्या निर्णयापर्यंत ली याला कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यावसायिक स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे जागतिक संघटनेने स्पष्ट केले आहे.
उत्तेजक समितीची सुनावणी कधी होणार आहे यासंदर्भात जागतिक संघटनेने कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान आपण कधीही उत्तेजकांचे सेवन केले नसल्याचा दाव ली याने केला आहे. निर्दोष सिद्ध होईपर्यंत लढा देणार असल्याचेही त्याने सांगितले. दुसऱ्या चाचणीच्या नमुन्यात डेक्सामेथॉनसन हे प्रतिबंधित उत्तेजक आढळल्याने लीवर बंदीची कारवाई झाली होती.
दुखापतीसाठी स्टेम सेल उपचारादरम्यान डेक्सामेथॉनसन घेतल्याचे लीने सांगितले. मात्र त्यानंतर झालेल्या स्पर्धेपूर्वीच्या चाचणीत दोषी आढळलो नाही. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान झालेल्या चाचणीचा निर्णय हा रहस्यमय असल्याचे लीने सांगितले. दरम्यान ली हा निर्दोष असून, याप्रकरणी त्याला सर्वतोपरी मदत करू अशी भूमिका मलेशियाच्या बॅडमिंटन पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.