माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत आणखी दोन डावांमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे दहाव्या फेरीअखेर त्याचे फक्त साडेपाच गुण झाले आहेत.
आनंदला अझरबैजानच्या रौफ मामेदोव्ह व रशियाच्या डेनिस खिस्मतुल्लीन यांनी पराभूत करीत सनसनाटी विजय मिळविला. पहिल्या पाच फेऱ्यांनंतर आनंदचे अडीच गुण होते. त्याने रशियाच्या व्लादिमीर बेलोव्ह व युक्रेनचा आंद्रे वोलोकितीन यांच्यावर शानदार विजय मिळविला. तथापि आठव्या फेरीत त्याला मामेदोव्हने हरविले. नवव्या फेरीत आनंदने मोल्दोवाच्या व्हिक्टर बोलोगन याच्यावर मात केली, मात्र पुन्हा दहाव्या फेरीत त्याला खिस्मतुल्लीन याच्याकडून अनपेक्षित हार स्वीकारावी लागली.
दहाव्या फेरीअखेर मॅग्नस कार्लसन (नॉर्वे) व सर्जी झिगाल्को (बेलारूस) यांचे प्रत्येकी आठ गुण झाले आहेत.
भारताच्या सूर्यशेखर गांगुलीने दहाव्या फेरीत हंगेरीच्या झोल्टान अल्मासी याच्याकडून पराभव स्वीकारला. त्यामुळे त्याला पाच गुणांवरच समाधान मानावे लागले. विदित गुजराथीचे साडेपाच गुण झाले आहेत. त्याने दहाव्या फेरीत स्पेनच्या फ्रान्सिस्को व्हॅलेजा पोन्स याच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली. बी. अधिबनने सर्बियाच्या इव्हान इव्हानिसेविकवर मात करीत दहाव्या फेरीअखेर आपली गुणसंख्या सहा केली आहे.
कृष्णन शशिकिरण याने स्पेनच्या डेव्हिड अन्तोन गुजारोवर आकर्षक विजय मिळविला. त्याचे आता साडेपाच गुण झाले आहेत. एस. पी. सेतुरामनने आतापर्यंत केवळ साडेतीन गुण मिळविले आहेत.