मुंबई : गूगलपासून नेटफ्लिक्सपर्यंत जगभरातील ब्रँडची क्रिकेटच्या ‘बॉण्ड’ला सलामी. निळ्या जर्सीवर ‘क्रमांक ७’ पाहिल्यावर कोणत्याही भारतीय चाहत्याच्या डोळ्यांसमोर महेंद्रसिंह धोनीच उभा राहतो. त्यानं भारतीय क्रिकेटच्या एका युगाचं नेतृत्व केलं. त्यामुळेच की काय, भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारानं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर रविवारी जगभरातील नामांकित ब्रँडनी धोनीला आपल्या शैलीत सलामी दिली.

मितभाषी स्वभाव हे धोनीचे वैशिष्टय़. शनिवारी ‘इन्स्टाग्राम’वरील एका वाक्यानिशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला रामराम ठोकला. ‘१९२९ वाजल्यापासून (सायं. ७.२९ वाजल्यापासून) मला निवृत्त समजा!’ एवढय़ाच वाक्यातून धोनीनं निवृत्तीची घोषणा केली. त्या ‘१९२९’ आकडय़ालाच धरून ‘पेटीएम’नं ‘तुला मैदानात ‘मिस’ करण्याची १९२९ पेक्षाही अधिक कारणं आमच्याकडे आहेत’ अशा शब्दांत माहीला त्याच्या कारकीर्दीबद्दल धन्यवाद दिलं, तर ‘सर्च इंजिनचा बादशाह’ असलेल्या ‘गूगल’ने ‘कितीही ‘सर्च’ केलं तरीही तुझ्यासारखा सापडणं कठीण आहे,’ असं सांगत त्याचा गौरव केला.

केवळ क्रिकेटप्रेमी भारतीयच नव्हे तर जगभरातील चाहत्यांच्या धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया येत असताना जगभरातील लोकप्रिय ब्रँड्सनी त्याला आपापल्या शैलीत अभिवादन केले. ‘संडे मूड : धोनी आणि रैनाला परत खेळताना पाहण्यासाठी आज सिनेमेही त्या काळातलेच,’ असं सांगत ‘धोनीला निवृत्तीच्या शुभेच्छा, पण या वाहणाऱ्या (स्ट्रीमिंग) अश्रूंचं काय करायचं?’ असा सवाल ‘नेटफ्लिक्स’ने केला. अमूलने तर नेहमीप्रमाणेच शब्दच्छल करत विविध चित्रांच्या माध्यमातून धोनीचे गोडवे गायले. ‘अखेर एकदाच्या ‘बेल्स’नी सुटकेचा नि:श्वास सोडला!’ असं सांगत ‘डिस्ने-हॉटस्टार’ने या चपळ यष्टिरक्षकाला सलाम केला.

अनेक ‘ब्रँड्स’नी धोनीच्या निवृत्तीतही आपल्या उत्पादनांच्या टिमक्याही वाजवल्या. ‘कुणाला सांत्वनपर खाऊ हवा असेल तर आम्ही आहोत’ असा संदेश ‘झोमॅटो’ने दिला, तर ‘ग्रेटेस्ट फिनिशर’ असं ‘केएफसी’नं आपल्याच उत्पादनावर झळकवलं. ‘आम्ही चहामध्ये विरघळून जातो, त्याहीपेक्षा जलद तू यष्टय़ा उडवतोस!’ ‘गरम चहा आणि कॅप्टन कूल आमचे फेव्हरिट’ असं सांगत ‘पारले-जी’नं माहीची महती मांडली.