आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धापासून वंचित असलेल्या रशियन खेळाडूंना जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीकडून (वाडा) दिलासा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘वाडा’चे अध्यक्ष क्रेग रिडी यांनी दिली.

उत्तेजकप्रकरणी खेळाडूंना पाठीशी घातल्याबद्दल रशियन उत्तेजक प्रतिबंधक समितीची २०१५ पासून मान्यता काढून घेण्यात आली होती. याबाबत रिडी म्हणाले, ‘‘उत्तेजक प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यासाठी रशियाने गेल्या काही महिन्यांमध्ये खूप चांगले प्रयत्न केले आहेत. आम्ही संलग्नतेबाबत जे काही नियम केले आहेत. त्या नियमांनुसार रशियाने सुधारणा केली असेल तर आम्ही त्यांच्यावरील बंदीची कारवाई मागे घेण्यास तयार आहोत.’’

रशियन खेळाडू मोठय़ा प्रमाणात उत्तेजक प्रकरणात अडकले असून त्यांना त्यांच्या उत्तेजक समितीचा अप्रत्यक्ष पाठिंबा लाभला आहे.

तसेच रशियन शासनानेही त्यांना पाठीशी घातले असल्याचा आरोप कॅनडातील कायदेतज्ज्ञ रिचर्ड मॅक्लारेन यांनी केला होता. त्या आधारे ‘वाडा’ संस्थेने सखोल चौकशी केली होती. रशियाचे खेळाडू मोठय़ा प्रमाणात उत्तेजक प्रकरणात अडकले असल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी रशियाची उत्तेजक समितीची मान्यता काढून घेतली तसेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने त्यांच्या अ‍ॅथलेटिक्स संघटनेला बडतर्फ केले होते. त्यामुळे रशियाच्या अनेक खेळाडूंना रिओ ऑलिम्पिकपासून वंचित राहावे लागले होते.

‘वाडा’ संस्थेने ज्या काही सुधारणा करण्याबाबत सुचविले होते. त्यावरून रशियाची माजी पोलव्हॉल्टपटू येलेना इसिनबायेव्हाने ‘वाडा’ संस्थेवरच टीका केली होती. रशियन खेळाडूंना हेतूपूर्वक बदनाम केले जात आहे. आमचे खेळाडू निदरेष असूनही त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले आहे अशीही टीका तिने केली होती.

‘‘रशियन उत्तेजक प्रतिबंधक समिती पुढील महिन्यापासून कार्यरत होईल. दक्षिण कोरियात पुढील वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकपासून नवीन उत्तेजक चाचणी संघटना कार्यरत होईल. उत्तेजक चाचणी पद्धत अधिक गतिमान होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे,’’ असे रिडी यांनी सांगितले.