पुढील जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा जपानमध्ये २०२१ साली होणार होती. पण ऑलिम्पिक स्पर्धा २०२१मध्येच होणार असल्यामुळे आता ही स्पर्धा २०२२मध्ये खेळवण्यात येणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने (फिना) दिली.

पुढील वर्षी फुकुओका येथे १६ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान जागतिक जलतरण स्पर्धा रंगणार होती, ती आता १३ ते २९ मे २०२२मध्ये खेळवण्यात येणार आहे. २०२० टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षांने पुढे ढकलण्यात आल्याने ही स्पर्धासुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ‘‘सर्व सहभागी सदस्यांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आल्यानंतर सर्वाचे हित लक्षात घेऊन एकमताने जागतिक जलतरण स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला,’’ असे ‘फिना’चे अध्यक्ष ज्युलियो मॅग्लियन यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘सध्या अभूतपूर्व अनिश्चितता पसल्यामुळे जागतिक जलतरण स्पर्धा लांबणीवर टाकणेच उचित ठरेल. त्यामुळे भविष्यात या स्पर्धेविषयीचे चित्र स्पष्ट होईल.’’ जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत डायव्हिंग, खुल्या पाण्यातील जलतरण तसेच तालबद्ध जलतरण आणि वॉटरपोलो या प्रकारांचा समावेश असणार आहे.