पुढील वर्षी भारतात होणाऱया ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाचे महाराष्ट्रात होणारे सामने सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानचा संघ महाराष्ट्रात खेळण्यासाठी आल्यास राज्यातील काही राजकीय पक्षांच्या आक्षेपामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारशी सल्लामसलत करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) महाराष्ट्रात होणारे पाकिस्तानचे नियोजित सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांचे राज्य सरकारसोबत बोलणे झाले असून पाकिस्तानचे सामने महाराष्ट्रात आयोजित न करण्याचा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
पुढील वर्षी होणाऱया ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमान पद भारताला मिळाले आहे. यानुसार देशात मुंबई, नागपूर, कोलकाता, धर्मशाला, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि मोहाली येथील स्टेडियम्सवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. नियोजित वेळापत्राकानुसार पाकिस्तान संघाचे मुंबई आणि नागपूर येथील स्टेडियम्सवर सामने होणे अपेक्षित आहे. परंतु, काही राजकीय पक्षांचा यास विरोध होऊ शकतो. त्यामुळे संघाची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हे दोन्ही सामने महाराष्ट्राऐवजी दुसऱया राज्यात खेळविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. मागील वर्षी शिवसेनेने कबड्डी आणि हॉकी स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागाला विरोध दर्शवत निदर्शने केली होती. त्यामुळे विश्चचकषासारख्या आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कोणतीही जोखीम न पत्करणे बीसीसीआयने पसंत केले आहे.