मागील विश्वविजेता वेस्ट इंडिज आणि ‘अनिश्चिततेचा महामेरू’ पाकिस्तान यांच्यातील विजेता संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवणारा चौथा संघ ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकी चार गुण गाठीशी असणाऱ्या या दोन संघांतील लढाईला उपांत्यपूर्व फेरीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. एका संघाला आपले जगज्जेतेपद टिकवायचे आहे, तर दुसऱ्या संघाची जेतेपदाची ईर्षां ही कमालीची तीव्र आहे. दोन्ही संघांनी भारताकडून हार पत्करून आपल्या ट्वेन्टी-२० अभियानाला सुरुवात केली. मग दोन्ही संघांनी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवून मुसंडी मारली.
शेर ए बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर मंगळवारी होणाऱ्या या लढतीत फिरकी गोलंदाजांचीच भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही संघांकडे फिरकीच्या बळावर सामने जिंकून देऊ शकणारी अस्त्रे आहेत. वेस्ट इंडिजकडे ऑफ-स्पिनर सुनील नरिन आणि लेग-स्पिनर सॅम्युअल बद्री असे जगद्विख्यात फिरकी गोलंदाज आहेत; तथापि पाकिस्तानकडे जादूई फिरकीपटू सईद अजमल आणि झुल्फिकार बाबर आहेत. शाहीद आफ्रिदी आणि मोहम्मद हाफीझ यांच्या फिरकीचे योगदानसुद्धा संघाच्या यशात महत्त्वाचे आहे. त्यामुळेच वेगवान गोलंदाजांना पुरेसा वाव नाही. जुनैद खान आणि रवी रामपॉल यांना त्यामुळेच एखाद-दुसऱ्या सामन्यात संधी मिळाली आहे.
संघ –
पाकिस्तान : मोहम्मद हाफीझ (कर्णधार), अहमद शहजाद, शरजील खान, उमर अकमल, कामरान अकमल, शोएब मलिक, शोएब मकसूद, शाहीद आफ्रिदी, सईद अजमल, झुल्फिकार बाबर, उमर गुल, बिलावल भट्टी, सोहेल तन्वीर, मोहम्मद तल्हा, जुनैद खान.
वेस्ट इंडिज : डॅरेन सॅमी (कर्णधार), ख्रिस गेल, ड्वेन स्मिथ, लेंडल सिमन्स, मार्लन सॅम्युअल्स, आंद्रे फ्लेचर, ड्वेन ब्राव्हो, जॉन्सन चार्लस्, आंद्रे रसेल, सुनील नरिन, सॅम्युअल बद्री, क्रिश्मर सँटोकी, रवी रामपॉल, दिनेश रामदिन, शिल्डन कॉट्रेल.