न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने भारताविरुद्धची जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढत शेवटच्या दिवसापर्यंत गेल्यासंदर्भात आनंद व्यक्त करतानाच सामन्याच्या निकालाबद्दल भाष्य केलं आहे. या सामन्याचा तीनपैकी कोणताही निकाल लागू शकतो, असं साऊदीने म्हटलं आहे. ही कसोटी रंगतदार स्थितीमध्ये आहे. सामना शेवटच्या दिवसापर्यंत गेल्याचा आनंद व्यक्त करतानाच साऊदीने भारतीय फलंदाजीविरोधात चांगली कामगिरी करावी लागेल असं म्हटलं आहे.

पाचवा दिवस आम्हाला कठीण गेला…

कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात २ बाद ६४ धावा केल्या आहेत. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गील तंबूत परतले आहे. भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे. कसोटीचा पहिला संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेल्याने राखीव दिवशी सुद्धा सामना खेळवला जाणार आहे. साऊदीनेच भारताच्या दोन्ही सलामीवीरांना दुसऱ्या डावात तंबूत पाठवलं. भारताच्या दुसऱ्या डावात साऊदीने शुभमन गिलला (८) पायचीत करून सलामीची जोडी फोडली. मग साऊदीने रोहित शर्माला (३०) पायचीत करीत आणखी एक धक्का दिला. खेळ थांबला, तेव्हा चेतेश्वर पुजारा १२ आणि विराट ८ धावांवर खेळत होते.

नक्की वाचा >> “तुझ्याकडे बघू की कॅमेराकडे?”; WTC Final विशेष मुलाखतीत बुमराहने मुलाखत घेणाऱ्या पत्नीलाच विचारला प्रश्न

भारतीय गोलंदाजांची उत्तम कामगिरी

सामन्याच्या पाचव्या दिवशी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात ३२ धावांची माफक आघाडी मिळवता आली. न्यूझीलंडने मंगळवारी २ बाद १०१ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु शमी आणि इशांत यांनी टिच्चून मारा करीत किवी फलंदाजांना एकापाठोपाठ एक हादरे दिले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने एकाकी लढत देत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला; परंतु इशांतमुळे त्याचे अर्धशतक हुकले. दुसऱ्या स्लीपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

मंगळवारी सकाळच्या सत्रात शमीने अनुभवी रॉस टेलरचा (३७ चेंडूंत ११ धावा) अडसर दूर केला. शुभमन गिलने शॉर्ट कव्हरला त्याचा सूर मारून झेल टिपला. मग इशांतने भरवशाच्या हेन्री निकोलसला (७) बाद केले. दुसऱ्या स्लीपमध्ये रोहित शर्माने त्याचा झेल घेतला. त्यानंतर शमीने बीजे वॉटलिंगचा (१) त्रिफळा उडवला.

नक्की पाहा >> Video : WTC Final आधी ऋषभ पंतला धोनीचा फोटो दाखवला तेव्हा…; एका क्षणी द्रविडचीही झाली आठवण

न्यूझीलंडच्या डावापुढे पूर्णविराम

सामन्याच्या दुसऱ्या सत्रात विल्यम्सनला कॉलिन डीग्रँडहोम (१३) आणि कायले जॅमीसन (२१) यांनी साथ देत धावसंख्येला स्थर्य देण्याचा प्रयत्न केला. पण शमीने ग्रँडहोमला पायचीत केले, तर जॅमीसनला जसप्रीत बुमराद्वारे झेलबाद केले. त्यानंतर खेळपट्टीवर ठाण मांडणारा विल्यम्सन माघारी परतला. उशिराने चेंडू हाती आलेल्या रविचंद्रन अश्विनने नील वॅगनरला भोपळाही फोडू दिला नाही. उत्तरार्धात टिम साऊदीने ३० धावांची झुंजार खेळी केली. पण रवींद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवून न्यूझीलंडच्या डावापुढे पूर्णविराम दिला.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : २१७

’ न्यूझीलंड (पहिला डाव) : ९९.२ षटकांत सर्व बाद २३५(डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यम्सन ४९; मोहम्मद शमी ४/७०, इशांत शर्मा ३/४८)

’ भारत (दुसरा डाव) : ३० षटकांत २ बाद ६४ (रोहित शर्मा ३०; टिम साऊदी २/१७)