संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आजपासून सुरुवात होत आहे. भारत आणि न्यूझीलंड संघ एकमेकांशी भिडणार असून जगज्जेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. दरम्यान इतक्या महत्वाच्या सामन्यात टॉस जिंकल्यास भारताने नेमका कोणता निर्णय घ्यायला हवा यासंबंधी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने सल्ला दिला आहे. सौऱभने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. ढगाळ वातारवण असलं तरी भारताने प्रथम फंलदाजी करावी, कारण परदेश दौऱ्यात भारतीय संघासाठी हे फायद्याचं ठरलं आहे असं गांगुलीने म्हटलं आहे.

भारतीय संघ विजयी होऊन मायदेशी परतेल असा विश्वास सौरभ गांगुलीने व्यक्त केला आहे. मात्र गांगुलीने यावेळी न्यूझीलंड संघाला पराभूत करणं कडवं आव्हान असल्याचंही मान्य केलं आहे.

World Test Championship : भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना आजपासून

इंडिया टुडेशी बोलताना गांगुलीने सांगितलं आहे की, “जर तुम्ही रेकॉर्ड पाहिलेत तर भारताने परदेशात चांगली कामगिरी केली आहे. आपण जेव्हा प्रथम फलंदाजी केली आहे तेव्हा सामने जिंकले आहेत. आता हा तुमच्या निवडीचा प्रश्न आहे की, प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला प्रेशर घ्यायचं की चौथ्या डावापर्यंत थांबायचं”.

“दक्षिण आफ्रिकेतील २००२ आणि २०१८ मध्ये आपण प्रथम फलंदाजी केली आणि प्रेशर कमी करुन धावा उभ्या करत सामने जिंकले आहेत,” असंही गांगुलीने यावेळी सांगितलं. दरम्यान गांगुलीने भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे.

“परदेशात खेळतो तेव्हा आघाडीचे फलंदाज खूप महत्वाचे ठरतात. आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तानचा दौरा केला तेव्हा आमच्याकडे विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांच्यासारखे फलंदाज असल्याने चांगले खेळल होतो. ते दोघेही नवीन चेंडू जुना होईपर्यंत खेळायचे. पण जेव्हा तुमचा मधल्या फळीतील फलंदाज ३० धावांवर २ गडी बाद अशा स्थितीत खेळायला येतो तेव्हा मात्र खूप आव्हानात्मक असतं,” असं गांगुलीने सांगितलं आहे.

संघ

– भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा.

– न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.