जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना आजपासून

साऊदम्पटन : अब्जावधी भारतीयांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा निर्धार विराट कोहलीने केला आहे, तर न्यूझीलंला जगज्जेतेपद जिंकून देण्याचे स्वप्न केन विल्यम्सनने जोपासले आहे. गेल्या दोन वर्षांच्या विविध संघांमधील लढतींनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाची सांगता क्रिकेटच्या पारंपरिक प्रकारातील विश्वविजेत्यासह होईल. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

कसोटी क्रिकेटला १४४ वर्षांचा  इतिहास आहे. एकदिवसीय, ट्वेन्टी-२० क्रिकेटप्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही जगज्जेतेपद देण्यासाठी विविध संघांमधील द्विराष्ट्रीय मालिकांतील गुणपद्धतीनुसार दोन अव्वल संघांमधील अंतिम सामन्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) महत्त्वाकांक्षी योजना आता अंतिम टप्प्यात आहे. भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार हे बिरूद सार्थकी ठरवून विश्वविजेतेपदाची गदा हॅम्पशायर बाऊलच्या बाल्कनीत उंचावण्याची विराटला ही उत्तम संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात गुणी खेळाडूंच्या संचासह विल्यम्सनने विराटच्या वाटेवर अडथळा निर्माण केला आहे. विश्वविजेत्या संघाला १६ लाख डॉलरचे इनामसुद्धा मिळणार आहे. न्यूझीलंडने नुकतेच इंग्लंडला त्यांच्या भूमीवरील कसोटी मालिकेत १-० असे नमवल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

रोहितच्या साथीला शुभमन सलामीला

अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या साथीला शुभमन गिल उतरेल, तर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या कसोटी विशेषज्ञ फलंदाजांवर भारताच्या मधल्या फळीची प्रमुख मदार असेल. रोहितकडून इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. याशिवाय विराट आणि सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असलेला ऋषभ पंत यांच्यामुळे भारताची फलंदाजीची फळी अधिक मजबूत भासत आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडगोळी फलंदाजीचा भार सांभाळण्यातही वाकबदार आहे.

अश्विन-जडेजावर फिरकीची भिस्त

इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांसह खेळपट्टीचे स्वरूप पाहता अश्विन आणि जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठीच्या स्पर्धेत मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांच्यापेक्षा अनुभवी इशांतला प्राधान्य देण्याचे धोरण भारताने आखले आहे.

कॉन्वे धोकादायक

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत उदयास आलेला नवा तारा डेव्हॉन कॉन्वेवर न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त असेल. याशिवाय अनुभवी रॉस टेलर, प्रसंगानुरूप झुंजार फलंदाजीची क्षमता असलेला विल्यम्सन, विल यंग, बीजे वॉटलिंग हे किवी फलंदाजीचे प्रमुख आधारस्तंभ असतील.

पटेलवर फिरकीची मदार

टिम साऊदीच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्यात ट्रेंट बोल्ट, नील व्ॉगनर, मॅट हेन्री, कायले जॅमीसन यांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या लक्षवेधी कामगिरीआधारे न्यूझीलंडने मिचेल सँटनरऐवजी इजाज पटेलला स्थान दिले आहे.

आमने सामने 

कसोटी : ५९, भारत : २१, न्यूझीलंड : १२, अनिर्णीत : २६

खेळपट्टी

खेळपट्टीवर चेंडूला वेग आणि उसळी मिळेल. तसेच जसे दिवस पुढे जातील, तसे खेळपट्टीकडून फिरकी गोलंदाजांनाही साहाय्य मिळेल.

संघ

*  भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा.

*  न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.  ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्या.

११ ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धामध्ये भारत सर्वाधिक ११व्यांदा अंतिम सामना खेळत आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया (१०) दुसऱ्या स्थानावर आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गोलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्स (७० बळी) पहिल्या आणि स्टुअर्ट ब्रॉड (६९) दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनला (६७) अग्रस्थान गाठण्यासाठी चार बळींची आवश्यकता आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या सर्वाधिक षटकारांच्या यादीत बेन स्टोक्स (३१) अग्रेसर आहे. रोहित शर्माला (२७) स्टोक्सला मागे टाकण्याची संधी आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपदात रोहितने सर्वाधिक चार शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लबूशेनसह तो संयुक्तपणे अग्रस्थानावर आहे.

इशांतला दोनशे कसोटी बळींचा टप्पा गाठण्यासाठी एका बळीची आवश्यकता आहे. कपिल देव (२१५) आणि झहीर खान (२०७) यांच्यानंतर हा टप्पा गाठणारा तो तिसरा वेगवान गोलंदाज ठरेल.

अश्विनच्या खात्यावर ४०९ बळी जमा असून, आणखी नऊ बळी मिळवल्यास तो हरभजन सिंगला (४१७) मागे टाकू शकेल.

६१ विराटच्या नेतृत्वाखाली हा ६१वा कसोटी सामना असून, तो माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (६०) मागे टाकून सर्वाधिक सामन्यांत भारतीय कर्णधारपदाचा नवा विक्रम प्रस्थापित करू शकेल.