पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याशिवाय आता गुणांच्या टक्केवारीनुसारच अंतिम फेरीतील दोन संघांची निवड केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी गुणांच्या टक्केवारीचा पर्याय स्वीकारला असून क्रिकेट समितीने सुचवलेली ही शिफारस आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केली आहे.

नव्या गुणपद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाने अग्रस्थानी मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाची गुणांची टक्केवारी ०.८२२ इतकी असून भारताची ०.७५ इतकी आहे. ‘‘क्रिकेट समिती आणि मुख्य कार्यकारी समितीने पूर्ण झालेले सामने आणि आपल्या कामगिरीनुसार कमावलेले गुण यानुसार गुणपद्धतीला पाठिंबा दर्शवला आहे. काही संघांना आपली चूक नसतानाही सामन्यात खेळता आलेले नाही, अशा संघांवर अन्याय होऊ नये, याकडेही लक्ष देण्यात आले आहे,’’ असे ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी म्हणाले.

करोना साथीमुळे या स्पर्धेतील काही सामने रद्द झाले आणि काही पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे रद्द झालेल्या सामन्यांसाठी प्रत्येकी एक गुण दोन्ही संघांना विभागून देण्यात यावा, असा प्रस्ताव होता. पण त्याऐवजी गुणांची टक्केवारीची पद्धत निवडण्यात आली.