जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) प्रतिष्ठेच्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पध्रेत जगभरातील अव्वल खेळाडू खेळतात. त्यामुळे ही आव्हानात्मक स्पर्धा जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केली. १२ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पध्रेची तयारी करण्यासाठी तिने काही स्पर्धा टाळून सरावाकडे लक्ष केंद्रित केले होते.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने मागील वर्षी दुबईत झालेल्या ‘वर्ल्ड टूर फायनल्स’मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. परंतु गेल्या आठवडय़ात लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पध्रेतून तिने माघार घेतली होती. ती तिसऱ्यांदा ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पध्रेसाठी पात्र ठरली आहे.

‘‘यंदा तयारीसाठी मला पुरेसा वेळ मिळाला असून, उत्तम फॉर्म असल्यामुळे कामगिरी चांगली होईल, असा विश्वास आहे,’’ असे सिंधूने सांगितले. यंदाच्या वर्षी सिंधूने राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक अजिंक्यपद या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये रौप्यपदक जिंकले, तर इंडिया आणि थायलंड खुल्या स्पर्धामध्ये उपविजेतेपद पटकावले.

अंतिम फेरीतील पराभवांविषयी सिंधू म्हणाली, ‘‘मी चालू वर्षांत पाच स्पर्धामध्ये अंतिम फेरीचे सामने खेळली आणि पराभूत झाली. विजेतेपदाची हुलकावणी ही दु:खद असते. परंतु आशियाई क्रीडा स्पध्रेतील निकालाबाबत मी समाधानी आहे.’’