श्रीलंकेचे तुटपुंजे आव्हान स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाचा डाव अनपेक्षितरीत्या कोसळला आणि श्रीलंकेने झोकात उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज रंगना हेराथच्या जादुई फिरकीपुढे न्यूझीलंड संघावर ‘हे राम’ म्हणण्याची पाळी आली. हेराथने फक्त ३ धावांमध्ये न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत पाठवण्याची किमया साधली. त्यामुळेच श्रीलंकेला ५९ धावांनी अशक्यप्राय विजय मिळवता आला.
सुपर-१० फेरीमधील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून ११९ धावांचे आव्हान उभारले होते. त्यावेळी किवी संघ आरामात उपांत्य फेरी गाठणार अशी चिन्हे दिसत होती. परंतु हेराथने ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना न्यूझीलंडच्या आशाआकांक्षांपुढे सुरूंग लावले. पहिल्या दोन्ही क्रमांकाची कामगिरी अजंथा मेंडिसच्या (६/८ आणि ६/१६) नावावर आहे.
या विजयानिशी पहिल्या गटातील अव्वल स्थानासह श्रीलंकेने उपांत्य फेरी गाठली असल्यामुळे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात मंगळवारी होणाऱ्या सामन्यातील विजेत्या संघाशी त्यांची ३ एप्रिलला गाठ पडणार आहे. तसेच ४ एप्रिला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.
न्यूझीलंडला धावांचा पाठलाग करताना कोरे अँडरसनची उणीव तीव्रतेने भासली. श्रीलंकेच्या डावात झेल घेताना झालेल्या दुखापतीमुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे अँडरसन फलंदाजीला उतरू शकला नाही.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ९.२ षटकांत सर्व बाद ११९ (महेला जयवर्धने २५, लाहिरू थिरिमाने २०; ट्रेंट बोल्ट ३/२०, जिमी नीशाम ३/२२) विजयी वि. न्यूझीलंड : १५.३ षटकांत सर्व बाद ६० (केन विल्यम्सन ४२; रंगना हेराथ ५/३)
सामनावीर : रंगना हेराथ.

उपांत्य फेरी
३ एप्रिल, गुरुवार    श्रीलंका वि. वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान    रात्री ७ वा.     मिरपूर
४ एप्रिल, शुक्रवार    भारत वि. दक्षिण आफ्रिका    रात्री ७ वा.    मिरपूर