पट्टाया (थायलंड) : तीन वेळा वजन उचलण्यात अपयशी ठरल्यामुळे युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जेरेमी लालरिंगुआ याला जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या ब गटातच १०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

साखळी फेरीचा सोपा अडथळाही त्याला पार करता आला नाही. पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात जेरेमीने २९६ किलो (१३६+१६३) वजन उचलले. १६ वर्षीय जेरेमीने स्नॅच प्रकारात १३२ किलो वजन उचलत शानदार सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नांत त्याने आपल्या वजनापेक्षा दुप्पट म्हणजेच १३६ किलो वजन उचलण्याची करामत केली. पण तिसऱ्या प्रयत्नांत त्याला १३९ किलो वजन उचलता आले नाही.

क्लिन आणि जर्क प्रकारात मिझोरामच्या या वेटलिफ्टरने यशस्वीपणे १६० किलो वजन उचलले. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नांत तो १६५ आणि १६७ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरला. चीनच्या फेंग युडाँग याने ३३३ किलो (१५३+१८०) किलो वजन उचलत गटात अव्वल स्थान पटकावले. मेक्सिकोचा जोनाथन अँटोनियो मुनोझ मार्टिनेझ आणि इंडोनेशियाचा डेनी हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

जेरेमीने अनेक स्पर्धामध्ये विक्रमी कामगिरी केली असून त्याच्या वैयक्तिक कामगिरीतही सुधारणा होत असते. ६७ किलो वजनी गटात जेरेमीची ही चौथी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरली.