भारतीय संघाला जागतिक महिला हॉकी लीगच्या उपांत्य फेरी टप्प्यातील ‘ब’ गटातील दुसऱ्या लढतीत अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. अमेरिकेने ४-१ अशा फरकाने विजय मिळवताना भारताच्या बचावफळीचे कच्चे दुवे समोर आणले. लिलिमा मिंझने भारतासाठी एकमेव गोल केला. या पराभवामुळे भारताची गटात चौथ्या स्थानावर घसरण झाली असून स्पध्रेत आगेकूच करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य असेल.

यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार बचाव करणाऱ्या भारतीय महिलांना सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयश आले. सामन्याच्या २४व्या मिनिटाला जिल विटमेरने अप्रतिम मैदानी गोल करताना अमेरिकेला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राखत अमेरिकेने सामन्यावर पकड घेतली, परंतु तिसऱ्या सत्रात लिलिमाने (३८ मि.) गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. मात्र, पुढील नऊ मिनिटांत अमेरिकेने आक्रमणाचा सपाटा लावताना भारतीय खेळाडूंना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. वेस्ट टेलर (४० मि.), विटमेर (४३ मि.) आणि व्हिटेस मिचेल (४९ मि.) यांनी गोल करत अमेरिकेची आघाडी ४-१ अशी भक्कम केली. ‘ब’ गटातील दुसऱ्या लढतीत अर्जेटिनाने २-० अशा फरकाने चिलीवर मात केली. अमेरिका सहा गुणांसह गटात अव्वल, तर अर्जेटिना तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बुधवारी भारताचा सामना गटात तळाशी असलेल्या चिलीशी होणार आहे.