जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी युवा कुस्तीपटू मंजू कुमारीची जय्यत तयारी

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसह ऑलिम्पिककरिता मी ५७ किलो वजनी गटात खेळणार आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये या गटात मला जपान आणि चीनच्या मल्लांकडून सर्वाधिक आव्हान मिळण्याची शक्यता असल्याचे मत भारताची युवा मल्ल मंजू कुमारीने व्यक्त केले.

भारताच्या ५७ किलो वजनी गटात पूजा धांडासारखी नावाजलेली मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असताना त्याच गटात मंजू कुमारीनेदेखील भारतीय कुस्तीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. मंजू कुमारीने नुकत्याच चीनमध्ये झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली होती. पदकाच्या लढतीत मंजूने व्हिएतनामच्या हुआंग दाओला ११-२ असे पराभूत केले होते. त्या पाश्र्वभूमीवर भारतात परतल्यानंतर मंजू कुमारीने साधलेल्या संवादात तिच्यापुढील लक्ष्यांबाबत दिलखुलास मते मांडली.

आशियाईनंतर आता कझाकस्तान येथे सप्टेंबरला होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठीची तयारी सुरू केल्याचे मंजूने सांगितले. ‘‘आता मी ५९ ऐवजी ५७ किलो वजनी गटातून खेळणार असल्याने त्यासाठी काही वेगळ्या प्रकारची तयारी करीत आहे. तसेच आहारातदेखील काही बदल केले आहेत,’’ असे मंजूने सांगितले.

‘‘प्रशिक्षक संजय मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली बालपणापासून आतापर्यंत सराव करीत आले असून त्याचा मला फायदा झाला. त्याशिवाय राष्ट्रीय शिबिरात विदेशी प्रशिक्षक अ‍ॅन्ड्रय़ू यांच्याकडूनदेखील काही वेगळ्या क्लृप्त्या शिकायला मिळत असल्याने त्याचादेखील फायदा होतो. माझे काका हरयाणातील मोठे कुस्तीपटू होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी कुस्तीत आले आणि कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळत असल्यानेच इथपर्यंत वाटचाल केली,’’  असे मंजूने नमूद केले.

दररोज सहा तास सराव

‘‘सध्या मी सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास असा ६ तास प्रत्यक्ष कुस्तीचा सराव करीत आहे. त्याशिवाय सकाळपासून रात्रीपर्यंत व्यायाम, आहार आणि पुरेशी विश्रांती असे सर्व कोष्टकानुसारच करीत आहे. त्यामुळे कुस्तीशिवाय अन्य कशाचाही विचारदेखील मनात येत नाही. त्यामुळे येत्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवण्यासह ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता मिळवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे,’’ असे मंजू कुमारीने सांगितले.