साधारणत: नव्वदीचे दशक.. साऱ्याच युवा पीढीला वेड लागले होते ते ‘त्या’ लढायांनी. एका रिंगमध्ये एकाहून एक बलवान मल्ल यायचे, त्यांच्यातील ती झुंज श्वास रोखून पाहायला गंमत वाटायची. कोण किती लढाया जिंकतो, समोरच्याला कसा चीतपट करतो, सारे रंजक होते. हिटमॅन, हल्कहॉगन, योकोझुना, अंडरटेकर, टाटांका, शॉन मायकल यांसह अनेक खेळाडू त्या वेळी तरुणाईच्या गळ्यातील ताईत होते. जवळपास ३०० किलो वजन असलेल्या योकोझुनाला जेव्हा टाटांकासारख्या साध्या मल्लाने उचलण्याचा भीम पराक्रम केला, तेव्हा तर सारेच या विश्वाकडे अधिक आकर्षित झाले. त्यानंतर काही काळ तो ज्वर थंडावला. पण गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा एकदा नव्या जोमाने पाय रोवून उभी आहे ती ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ म्हणजेच वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंट. सुरुवातीला ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ (वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन) म्हणून ते ओळखले जायचे. आता हा फक्त खेळ राहिलेला नाही तर ते एक मनोरंजनाचे उत्तम साधन झाले आहे.

सध्याच्या या धावत्या जगात मनोरंजन म्हणून काहीही लोकांना आवडू शकते. त्यामुळे ‘डब्ल्यूडब्ल्यूई’सारखा मनोरंजनाचा ‘ब्लॉकबस्टर’ येत्या काही दिवसांत भारतातही यशोशिखर गाठेल, पण हा खेळ नाही तर फक्त मनोरंजन आहे, हे मनाशी ठरवूनच ते पाहायला हवे.

आता भारतावर लक्ष

‘डब्ल्यूडब्ल्यूई’ बऱ्याच देशांत पाहिले जाते. आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये ते बस्तान बसवत आहेत, पण त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. भारतात या झुंजी लढवायच्या म्हणजे मायदेशातील मल्ल हवेत. त्यासाठीच त्यांनी दुबईतील प्रशिक्षण शिबिरामध्ये १० भारतातील व्यक्तींना संधी दिली होती. भारतातील खेडय़ांमध्ये जाऊन या गुणवत्तेचा शोध घेण्यात आला होता. त्यामध्येच बरेच खेळाडू होते. कुणी कुस्ती, वेटलिफ्टिंग, कबड्डी यापूर्वी खेळत होते. या शिबिरात प्रत्येक दिवशी जवळपास सहा तासांचा व्यायाम केला गेला. त्याचबरोबर लढती कशा करायच्या असतात, याचे प्रशिक्षण दिले गेले. सामजमाध्यमांवरून ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ने भारतातील युवा पिढीला आपलेसे केले आहे, आता काही दिवसांमध्येच ते भारतात येऊन दाखलही होतील.

खेळ नव्हे, मनोरंजन

खेळाला काही नियम असतात, तसेच ते या लढतींनाही आहेत. पण पूर्वी या लढती जेवढय़ा खऱ्या वाटायच्या, तेवढय़ा आता वाटत नाहीत. कारण एखाद्या बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे या लढतींची संहिता लिहिली जाते. फक्त खेळाच्या जोरावर इथे मल्ल जिंकत नाही, तर चाहत्यांचा पाठिंबा कोणाला आहे, या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. भारताचा एक मल्ल या लढतींचा एक भाग आहे. पण नाव न सांगण्याच्या अटीवरून त्याने काही गोष्टींचा उलगडा केला. या लढाया सुरू झाल्यावर कोणत्या मल्लाला कसा प्रतिसाद मिळतो, हे महत्त्वाचे ठरते. काही वेळा क्षणाक्षणाला लोकांचा प्रतिसाद बदलत असतो. त्यानुसार आपला खेळ बदलायला लागतो. चाहत्यांना जे आवडते ते आपण करायला हवे. बऱ्याचदा अभिनयाच्या जोरावरही चाहत्यांना खिळवून ठेवायला लागते. एकंदरीत चाहते मंत्रमुग्ध व्हायला हवेत आणि त्यांचे मनोरंजन व्हायला हवे, त्यासाठी जे काही करता येईल, ते करायलाच हवे. बॉलीवूडच्या भाषेत सांगायचे झाले, तर ही मनोरंजनासाठीची ‘ढिश्यूम.. ढिश्यूम..’ आहे.

‘डब्ल्यूडब्ल्यूई’ पूर्ण नियोजनानुसार काम करत असते. त्यामुळे येत्या काही दिवसांत तुम्हाला बरेच सुखद धक्के मिळू शकतात. ‘डब्ल्यूडब्ल्यूई’चा भारतात फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भारतातील चाहत्यांसाठी आम्ही नक्कीच भव्य काहीतरी करण्यासाठी उत्सुक आहोत. येत्या काही दिवसांमध्ये भारतात आम्ही तुम्हाला नव्या रंगात दिसणार आहोत.   एड वेल्स, डब्ल्यूडब्ल्यूई कार्यकारी उपाध्यक्ष.

भारतातून आम्हाला समाजमाध्यमांवर फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता भारतात आम्ही मोठय़ा प्रमाणावर गुणवत्ता शोधण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही सुरुवातीला फक्त उत्तर भारतामध्ये गुणवत्ता शोधत होतो, पण आता संपूर्ण भारतावर लक्ष केंद्रित करणार आहोत. एकंदरीत लवकरच भारतामध्ये आम्ही दाखल होऊन त्यांना या लढतींचा आस्वाद देण्यासाठी उत्सुक आहोत. स्टेफनी मॅकमोहन, डब्ल्यूडब्ल्यूई मुख्य ब्रँड अधिकारी.