सचिनने जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारीभारताचे सुवर्णाष्टक साकारले. पोलंड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला बॉक्सिंगपटूंनी सात आणि पुरुषांमध्ये सचिनने सुवर्णपदकांची कमाई केल्यामुळे स्पर्धेखेरीस भारताच्या नावावर एकूण आठ सुवर्ण जमा झाले.

सचिनने पुरुषांच्या ५६ किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येर्बोलट सॅबीला ४-१ असे नमवले. सचिनने अंतिम लढतीतील पहिल्या फेरीत येर्बोलटने ३-२ अशी आघाडी मिळवली. परंतु त्यानंतरच्या फेरीत सचिनने पुनरागमन केले. अखेरची फेरी संपण्यासाठी काही सेकंद शिल्लक असतानाच येर्बोलटच्या चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे पंचांनी सचिनला विजयी घोषित केले. २०१६नंतर प्रथमच एखाद्या भारतीय पुरुष बॉक्सिंगपटूने या स्पर्धेत जेतेपद मिळवले.

गुरुवारी गितिका, बेबीरोजिस्ना चानू, पूनम, विन्का, अरुंधती चौधरी, सानामचा चानू आणि अल्फिया पठाण यांनी महिलांच्या विविध गटांत सात सुवर्णपदकांवर नाव कोरले. त्यापूर्वी, पुरुषांच्या अन्य गटांतील उपांत्य फेरीत अंकित नरवाल (६४ किलो), विश्वमिता चोंगथोम (४९ किलो) आणि विशाल गुप्ता (९१ किलो) यांना पराभव पत्करावा लागल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारत पदकतालिकेत अग्रस्थानी

प्रत्येकी १० पुरुष आणि महिला बॉक्सर्ससह या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताने पदकतालिकेत अग्रस्थान मिळवण्याची किमया साधली. तब्बल ५२ देशांतील ४१४ बॉक्सर्समध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वाधिक आठ सुवर्णांसह तीन कांस्यपदक जिंकून एकूण ११ पदके पटकावली. दुसऱ्या क्रमांकावरील रशियाला एकच सुवर्णपदक मिळवता आले.