जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कडवी झुंज देत इराणचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर्यन घोलामीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. त्यामुळे सहाव्या फेरीअखेर प्रज्ञानंद आणि आर्यन यांनी १८ वर्षांखालील खुल्या गटात पाच गुणांनिशी संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले आहे. महिलांमध्ये अग्रमानांकित दिव्या देशमुख हिने शानदार विजयाची नोंद करत विजेतेपदाच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे.

पवई येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना द्वितीय मानांकित प्रज्ञानंदने सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा अवलंबला होता. संपूर्ण लढतीत आर्यन घोलामीचे पारडे जड होते. पण प्रज्ञानंदने सुरेखपणे चाली रचत ३९व्या चालीला ही लढत बरोबरीत सोडवली. भारताचा ग्रँडमास्टर पी. इनियन याने जर्मनीच्या व्हॅलेंटिन बकेल्सविरुद्ध विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ५० चालीनंतर दोघांनीही बरोबरी पत्करण्याचे मान्य केले. इनियन ४.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कझाकस्तानच्या लिया कुरमांगालियेव्हा हिला पराभूत केले. भारताची रक्षिता रवी, हॉलंडची एलिन रोबर्स आणि रशियाची एकतारिना नासीरोव्हा यांनी पाच गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले असून त्याखालोखाल दिव्याने ४.५ गुण मिळवले आहेत.