जगातील सर्वात महान फुटबॉलपटू कोण, लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो? अशा चर्चा नेहमी रंगत असतात. पण सध्या संपूर्ण फुटबॉलविश्वात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे गॅरेथ बॅलेची. टॉटनहॅम हॉट्सपरकडून गॅरेथ बॅलेला करारबद्ध करताना रिअल माद्रिदने बॅलेवर १०० दशलक्ष युरोची विश्वविक्रमी बोली लावली आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या महान खेळाडूला मागे टाकून वेल्सच्या २४ वर्षीय बॅलेने जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू होण्याचा मान पटकावला आहे. एकीकडे स्पेन संघ आर्थिक मंदीत सापडला असताना इतक्या विक्रमी बोलीसाठी बॅले पात्र होता का, हाच प्रश्न सर्वाना भेडसावत आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो, सर्जीओ रामोस, झाबी अलोन्सो, करीम बेन्झेमा यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू असताना रिअल माद्रिदला गॅरेथ बॅलेची गरज का भासली, याचे मुख्य कारण म्हणजे ला लीगा (स्पॅनिश लीग) फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद बार्सिलोनाकडून खेचून आणणे हेच आहे. बार्सिलोनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यापैकी सरस कामगिरी करणाऱ्या संघाकडे स्पॅनिश लीगचे जेतेपद जायचे. गेल्या काही मोसमात मेस्सीने रोनाल्डोला चारीमुंडय़ा चीत करून बरेच विक्रम आपल्या नावावर केले. रोनाल्डोवरील कामगिरी उंचावण्याचे दडपण वाढतच होते. त्यातच या मोसमात बार्सिलोनाने ब्राझीलचा युवा खेळाडू नेयमारला करारबद्ध केले. त्यामुळे रिअल माद्रिदला एकटय़ा रोनाल्डोकडून स्पॅनिश लीगचे शिवधनुष्य पेलणार नाही, याची शंका वाटू लागली होती. त्यामुळे रिअल माद्रिदने गॅरेथ बॅलेचा संघात समावेश करून घेतला. आता मध्यभागी रोनाल्डो, डाव्या बाजूकडून बॅले आणि आणखी कुणीतरी अशी भक्कम आघाडीवीरांची फळी रिअल माद्रिदकडे तयार झाली आहे.
गॅरेथ बॅले आणि ९५ दशलक्ष युरो मिळवून आतापर्यंत सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूचा तुरा मिरवणारा रोनाल्डो हे आता एकाच संघातून खेळणार आहेत. त्यामुळे या दोघांचा खेळ पाहण्याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.
बॅलेची चपळता, पासिंगची अद्भूत शैली, ड्रिब्लिंगचे कौशल्य आणि प्रतिस्पध्र्याना चकवून चेंडू गोलजाळ्यात पोहोचवण्याची त्याची क्षमता याबाबत कोणालाही तिळमात्र शंका नाही. साउदम्प्टनकडून क्लब कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या बॅलेने टॉटनहॅमकडून खेळताना आपली गुणवत्ता दाखवून दिली. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या गेल्या मोसमात तो कारकिर्दीच्या शिखरावर होता. गेल्या मोसमात २६ गोल झळकावणाऱ्या बॅलेने संघ अडचणीत असताना नऊ वेळा गोल करून टॉटनहॅमला विजय मिळवून दिला आहे. आता रिअल माद्रिदकडून खेळताना तो कशी सुरुवात करतो, याचीच उत्सुकता सर्वाना आहे.
बॅलेला करारबद्ध करण्याचा विचार बार्सिलोनाने याआधीच केला होता. पण चेंडूवर कमी वेळ ताबा ठेवण्याच्या बार्सिलोनाच्या शैलीत तो पूर्णपणे फिट बसेल की नाही, याबाबत शंका उद्भवल्याने बार्सिलोनाने बॅलेवर बोली लावण्याचा विचार सोडून दिला. पण रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कार्लो अँकलोट्टी यांनी प्रतिहल्ले चढवण्याची त्याची क्षमता आणि चेंडूवर ताबा मिळवण्याच्या कौशल्यामुळे बॅलेवर विश्वास दाखवला आहे.
बॅलेला करारबद्ध करण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य, याचे उत्तर मिळेलच. पण त्याला करारबद्ध करण्यासाठी रिअल माद्रिदने मोजलेली रक्कम तो आपल्या ११ क्रमांकाच्या जर्सीच्या विक्रीतून मिळवून देईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल. तसे झाले तर रोनाल्डो, मेस्सी यांच्या मांदियाळीत आणखी एका नव्या ताऱ्याचा समावेश झाला, असेच म्हणावे लागेल.