ऑलिम्पिक, आशियाई किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेचे पथक निश्चित करताना नेहमीच संख्या हा मुद्दा ऐरणीवर असतो. हमखास पदक जिंकू शकतील, हाच एकमेव निकष लावून खेळाडू पाठवले जातात, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र पदाधिकारी, सरकारी अधिकारी यांचीच खोगीरभरती इमानेइतबारे केली जाते, ती आपली पत राखण्यासाठी. आशियाई क्रीडा स्पध्रेला प्रारंभ होण्यापूर्वी काही तास आधी आपल्या पथकातील व्यक्तींची संख्या ६७९ आहे आणि यापैकी खेळाडू ५१६ आहेत, हे स्पष्ट झाले, परंतु या आकडय़ापेक्षा मोठी सल दुसरीच आहे. जी पदके आपण जिंकू शकलो असतो पण तरीही त्यासाठी खेळाडू निवडण्यातही आपण जो निरुत्साह दाखवला आहे तो अधिक वेदनादायी आहे. क्रिकेट आणि टेनिस या खेळांचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
भारतीय संघाकडे क्रिकेटमधील विश्वविजेतेपद आहे, परंतु आशियाई क्रीडा स्पध्रेत पाठवण्यासाठी ११ खेळाडूही नसावेत, ही शरमेची बाब म्हणावी लागेल. देशात सध्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, ज्याचे कुणालाही सोयरसुतक नाही. परंतु पदकापेक्षा फ्रेंचायझींचे कोडकौतुक महत्त्वाचे मानण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) धन्यता वाटत आहे. केंद्र सरकार, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, क्रीडा खाते आदी कोणत्याही यंत्रणा बीसीसीआयला नियंत्रणात आणू शकलेल्या नाहीत. मूठभर नेत्यांच्या पाठबळावरच क्रिकेटची ही स्वयंकेंद्री राजवट सुरू आहे. २०१०पासून आशियाई क्रीडा स्पध्रेत क्रिकेटला स्थान आहे, परंतु भारताला या पदकाचे अजिबात महत्त्व नाही. बांगलादेश आणि श्रीलंका सोडल्यास क्रिकेटमध्ये चीन, मलेशिया, द. कोरिया, कुवेत, मालदीव, नेपाळ, अफगाणिस्तान, हाँगकाँग असे संघ सहभागी आहेत. त्यामुळे भारताला सुवर्णपदक जिंकणे तसे फारसे कठीण मुळीच नव्हते. मुंबईचा रणजी संघसुद्धा या स्पध्रेचे विजेतेपद सहजगत्या जिंकू शकला असता. पण इथे या पदकाची किंमत कळायला हवी ना?
भारतीय संघाने पुरुषांप्रमाणेच महिलांचा संघही पाठवण्यात अनुत्सुकता दाखवली आहे. एकीकडे पुरेसे सामने खेळायला मिळत नाहीत, म्हणून भारतातील महिला क्रिकेटपटू नाराज असतात. मग महिलांच्या संघाने तरी किमान सहभागी व्हायला काहीच हरकत नव्हती. पाकिस्तानचा पुरुषांचा संघ सहभागी झालेला नाही, परंतु त्यांचा महिलांचा संघ मात्र आशियाई स्पध्रेत क्रिकेट खेळणार आहे. बीसीसीआय जर पुरेसे सहकार्य करीत नसेल तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने स्वतंत्र क्रिकेट संघ स्थापण्याची धमक क्रीडा मंत्रालयाने दाखवायला हवी होती. १९९८मध्ये क्वालालम्पूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या वेळी भारतात राष्ट्रकुलसाठी क्रिकेटचा संघ पाठवण्याबाबतची चर्चा तीव्रपणे रंगली होती. अखेर बीसीसीआयला राष्ट्रकुलच्या पदकासाठी एक आणि टोरोंटोतील सहारा चषक स्पध्रेसाठी दुसरा संघ असे दोन स्वतंत्र संघ स्थापन करावे लागले होते. पण यंदाच्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या वेळी मात्र त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. त्यामुळेच या न मिळणाऱ्या क्रिकेटमधील दोन पदकांचे शल्य भारताला अधिक बोचणार आहे.
२०१०मध्ये गुआंगझाऊला झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताच्या टेनिसपटूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी पाच पदकांची कमाई केली होती. परंतु यंदा लिएण्डर पेस, रोहन बोपण्णा, सोमदेव देवबर्मन आणि महेश भूपती आदी खेळाडूंना पदकापेक्षा वैयक्तिक गुणांचे मोल अधिक वाटल्यामुळे त्यांनी माघार घेणे पसंत केले आहे. त्यामुळे अननुभवी टेनिसपटूंकडून फारशा अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. तूर्तास, भारतीय पथकाला यशस्वी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देऊया!