X

…तर आतापर्यंत घरी बसलो असतो ! गौतमच्या टिकेला विराटचं ‘गंभीर’ प्रत्युत्तर

मी बाहेरील लोकांसारखा विचार करु शकत नाही !

विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोन आजी-माजी खेळाडूंमधील शाब्दिक द्वंद्व काही केल्या थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर एकही आयपीएलचं विजेतेपद नाहीये. या मुद्द्यावरुन गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी, विराट कोहलीने आपलं कर्णधारपद कायम राहिल्याबद्दल आभार मानायला हवेत असं वक्तव्य केलं होतं. याला प्रत्युत्तर देताना विराटने, जर बाहेरच्या लोकांनी केलेल्या टीकेचा विचार करत बसलो तर आतापर्यंत घरी बसलो असतो असं प्रत्युत्तर दिलं आहे.

गौतम गंभीरने केलेल्या टीकेबद्दल विचारलं असताना विराट म्हणाला, “साहजिकच एक खेळाडू म्हणून तुम्हाला ही स्पर्धा जिंकावीशी वाटणारच. मी जे करणं अपेक्षित आहे तेच करतोय. मी स्पर्धा जिंकतो की नाही यावरुन बाहेर कोणीही मत तयार करत असेल तर मला त्याची पर्वा नाही. मी प्रत्येक वेळेला महत्वाच्या स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काहीवेळा ते शक्य होत नाही. जर मी देखील बाहेरील लोकांसारखा विचार करत बसलो तर मी पाच सामनेही मैदानात टिकलो नसतो, आतापर्यंत मी घरी बसलो असतो.”

अवश्य वाचा – …तर आयपीएल खेळणार नाही, पहिल्याच सामन्याआधी विराटचं मोठं वक्तव्य

“मी आयपीएल जिंकू शकलो नाही याबद्दल बाहेर लोकं चर्चा करतात, बोलत असतात याची मला कल्पना आहे. त्यांना काहीतरी बोलण्याची संधीच हवी असते. मात्र माझ्यावर कर्णधार म्हणून जबाबदारी आहे. माझ्या संघाला आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवून द्यायला मला नक्की आवडेल.” गौतम गंभीरने केलेल्या टीकेवर विराट कोहलीने आपली बाजू स्पष्ट केली.

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यानेही विराटची पाठराखण केली आहे. आयपीएल ही स्पर्धा एकट्याने जिंकता येत नाही असं म्हणत फ्लेमिंगने विराटला पाठींबा दिला आहे. त्यामुळे विराट कोहली यंदाच्या हंगामात आपल्या संघाला पहिलं विजेतेपद मिळवून देतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – विराटच्या मदतीसाठी धावला फ्लेमिंग, गौतम गंभीरच्या टिकेला दिलं प्रत्युत्तर

  • Tags: gautam-gambhir, IPL 2019, rcb, virat-kohli,