News Flash

..अन्यथा म्हणावे लागेल कबड्डी हा कधीतरी भारतीय खेळ होता!

‘मेरी कोम’ या चित्रपटात खेळाडू, खेळातील प्रशासक आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर खेळाडूंना मिळणारी वागणूक याबाबतचे वास्तव रेखाटण्यात आले आहे.

| October 12, 2014 07:35 am

‘मेरी कोम’ या चित्रपटात खेळाडू, खेळातील प्रशासक आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर खेळाडूंना मिळणारी वागणूक याबाबतचे वास्तव रेखाटण्यात आले आहे. ते पाहून मुंबईतील एका क्रीडाविषयक खटल्यासंदर्भातील k02सुनावणीप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) मंडळींना पुढील सुनावणीला येताना जरा ‘मेरी कोम’ चित्रपट पाहा, अशा सूचनाच केल्या. अर्थात चित्रपटातील चित्रण आणि वास्तव यांची चर्चा करण्यापेक्षा ‘जिथे धूर आहे, तिथे आग असणारच’ हा न्याय लावणे जास्त समर्पक ठरेल. हे ध्यानी घेऊनच आशियायी क्रीडा स्पर्धेतील कबड्डीच्या निसटत्या यशाकडे पाहावे लागेल..
नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील कबड्डी या क्रीडा प्रकारात भारताने अपेक्षेप्रमाणेच दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भारताच्या महिला संघाने आत्मविश्वासाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी पुरुषांना मात्र जेतेपद मिळवण्यासाठी प्रचंड झगडायला लागले. इराणच्या भक्कम आक्रमणापुढे भारताच्या पुरुष संघाच्या पायाखालची जमीनच सरकली होती, परंतु अनुभवाच्या बळावर जेमेतेम दोन गुणांनी मिळवलेला विजय आणि विजेतेपद मात्र आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे.
कबड्डीचा ऐतिहासिक वारसा भारताकडे आहे. पण कालानुरूप होत गेलेल्या बदलांचे तंदुरुस्ती आणि तांत्रिकतेच्या अंगाने विश्लेषण करून खेळाला विकसित करण्याऐवजी भारतीय कबड्डी ही कौटुंबिकतेमध्येच रमण्यात अधिक धन्यता मानते. थायलंड, कोरिया, इराण आणि जपान यांनी भारताकडूनच कबड्डीचे धडे घेतले, परंतु इन्चॉनला आलेल्या या संघांसोबत भारताप्रमाणे फक्त दोन प्रशिक्षक नव्हते. तर तंदुरुस्तीकडे लक्ष पुरवणारा तंदुरुस्तीतज्ज्ञ (फिजिओ), तंदुरुस्तीचा सराव घेणारा सरावतज्ज्ञ (ट्रेनर), मानसतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ असा साहाय्यकांचा फौजफाटा होता. परंतु कबड्डी ही श्री. आणि सौ. गेहलोत दाम्पत्याची कौटुंबिक जहागिरी. जर्नादनसिंग हे आंतरराष्ट्रीय आणि आशियाई हौशी कबड्डी महासंघांचे अध्यक्षपद वर्षांनुवष्रे टिकवून आहेत आणि भारतीय हौशी कबड्डी महासंघावर त्यांच्या पत्नी मृदुल भदौरिया विराजमान आहेत. कबड्डीच्या निमित्ताने मग आंतरराष्ट्रीय सहल असो किंवा प्रो-कबड्डीच्या निमित्ताने भारतदर्शन हे दाम्पत्य पर्यटनाचा यथेच्छ आनंद लुटते. इतकेच कशाला, या तमाम गेहलोतशाही महासंघांवर कार्यरत असणाऱ्या त्यांच्या एका विश्वासू आणि ‘चतुर’ सेवकानेही प्रो-कबड्डीच्या निमित्ताने कुटुंबीयांसह भारत सफर केली. परंतु भारतीय संघातील खेळाडूंनी जेव्हा फिजिओ आदींविषयी विचारणा केली, तेव्हा मात्र परवडत नाही, असे कारण देण्यात आले. ‘मेरी कोम’मध्ये हेच वास्तव तर दाखवण्यात आले आहे.
प्रो-कबड्डी लीगमध्ये दमून-भागून आणि दुखापतींनिशीच भारतीय पुरुष संघातील खेळाडू इन्चॉनला गेले. आशियाई सुवर्णपदक आमचेच, हा दृढ अतिआत्मविश्वास त्यांच्यात होता. राकेश कुमार, जसबीर सिंग, अनुप कुमार, अजय ठाकूर असे एकापेक्षा एक तारे या संघात होते. परंतु कबड्डीमधली लढाई फक्त चढाईपटूंच्या बळावर जिंकता येत नाही, हेच बहुधा निवड समिती विसरली असावी. त्यामुळे मनजीत चिल्लर आणि गुरप्रीत सिंगच्या साथीला पोलादी क्षेत्ररक्षणाची फळीच नव्हती. याशिवाय डाव्या कोपऱ्यात होता तो उंचापुरा आणि बलवान, पण निरुपयोगी नवनीत गौतम. गेहलोत यांच्या राजस्थान राज्यातीलच हा ३१ वर्षांचा ‘दादा’ खेळाडू. राजस्थान कबड्डी असोसिएशनवर अनेक वष्रे कार्यरत असणाऱ्या गोविंद नारायण शर्मा यांचा सुपुत्र असल्याने त्याला मानाचे स्थान दिले जाते. प्रो-कबड्डी लीगच्या पहिल्यावहिल्या जेतेपदावर नाव कोरणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सचा हा कर्णधार. पण या यशात नवनीतचा वाटा मात्र खारीचा. प्रो-कबड्डीच्या १४ सामन्यांपैकी नवनीतच्या खात्यावर पकडीचे गुण फक्त १८. एकंदर ४५ पकडींच्या प्रयत्नांपैकी २८ अपयशी पकडी करणारा हा धुरंदर आशियाई स्पध्रेच्या अंतिम सामन्यात मात्र आपला खेळ लपवू शकला नाही. त्यामुळे इराणविरुद्ध भारतीय संघ पिछाडीवर पडल्यानंतर डावा कोपरा आंदण मिळालेला हा गौतम अचानक गायब झाला. (कारण सामना वाचवण्यासाठी त्याला नाइलाजास्तव बसवावे लागले.) यंदा पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राकडून हरणारा राजस्थानचा संघ ६१व्या राष्ट्रीय स्पध्रेत त्याच संघाला पुन्हा हरवतो कसा आणि अजिंक्यपद मिळवतो कसा, हे सारेच कसे आश्चर्यचकित करणारे आहे. परंतु कबड्डीतील जाणकारांना मात्र या मागील वास्तव माहीत आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मात्र अजून चौकशी अहवालाबाबत काय निर्णय घ्यायचा, हे अद्याप ठरवू शकलेले नाही.
भारताच्या पुरुष आणि महिला संघाचे सरासरी वय हे २७ ते २८ वष्रे असल्याचे सिद्ध होते. त्या तुलनेत इराण, कोरिया, थायलंड या संघांतील खेळाडूंची सरासरी वये हे २४ वष्रे आहेत. वय आणि तंदुरुस्ती हे मुद्दे भारतात फारसे महत्त्वाचे मानले जात नाही. इथे फक्त अनुभवी खेळाडूंचीच पूजा केली जाते आणि गेहलोत यांच्या मर्जीतल्या खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा आणि पंचांचा विकास होतो. गेहलोतशाहीच्या सावटाखालून जेव्हा कबड्डी बाहेर पडेल, तेव्हाच या खेळाचा नव्या पद्धतीने विचार करता येईल, हे कबड्डीमधील अनेक जाणकारांना पटते. परंतु पाण्यात राहून मगरीशी वैर पत्करण्यास कुणी तयार नसल्यामुळे कबड्डीचा विकास खुंटला आहे. भारताच्या निसटत्या विजयाचे श्रेय कर्णधार राकेश कुमारला द्यायला हवे. पण आता तो गेली दहा वष्रे भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. ३२ वर्षांच्या असलेल्या राकेशने निवृत्तीचा मार्ग पत्करून नव्या दमाच्या खेळाडूंना संधी द्यायला हवी. पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा हे भारतीय कबड्डी संघासमोरील आगामी महत्त्वाचे आव्हान असणार आहे. भारताच्या आशियाई सुवर्णपदकाचे आत्मपरीक्षण करून भारतीय कबड्डी सकारात्मक मार्गाने विचार करेल, अशी तूर्तास तरी आशा बाळगूया. अन्यथा भविष्यात आपल्याला म्हणावे लागेल की कबड्डी हा कधीतरी भारतीय खेळ होता!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 7:35 am

Web Title: would have to say kabaddi once a indian game
टॅग : Kabaddi
Next Stories
1 गुजराथी, राजपारा यांना पराभवाचा धक्का पद्मिनी राऊतची संयुक्त आघाडी कायम
2 फॉम्र्युला-वनमध्ये सुरक्षेच्या बाबतीत सुधारणा होणार
3 राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावरून मोदी यांच्या हकालपट्टीचा दावा
Just Now!
X