भारतीय कुस्ती आणि बेशिस्तपणा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पध्रेत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या योगेश्वर दत्तने आपल्या वागणुकीद्वारे जणू देशवासीयांचा अपमानच केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी मिळणे, ही पूर्वी खूप भाग्याची गोष्ट समजली जात असे. मात्र आता बहुतेक सर्वच खेळांमधील भारतीय खेळाडूंना अनेक वेळा परदेश वाऱ्या करण्याची संधी मिळत असते, तरीही परदेशातील प्रत्येक स्पर्धेत आपल्यालाच भाग घेण्याची संधी मिळेल असा प्रयत्न अनेक खेळाडूंकडून होत असतो. मग त्यासाठी देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली तरी त्याची फिकीर त्यांना नसते. आपला हेतू साध्य करण्यातच त्यांना मोठा आनंद मिळत असतो. योगेश्वरसारख्या वलयांकित खेळाडूकडूनही अशी लाजिरवाणी कामगिरी व्हावी, हीच मोठी मनाला बोचणारी गोष्ट आहे. जागतिक स्पर्धा अमेरिकेतील लास व्हेगास या शहरात आयोजित करण्यात आली आहे. हे शहर म्हणजे पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध शहर आहे. कॅसिनो, उंची मद्याची व मदनिकांची रेलचेल असलेल्या या शहराची भुरळ अब्जावधी लोकांना पडत असते. योगेश्वरही त्याला अपवाद नाही. शासकीय खर्चाने आपल्याला तेथे जाण्याची संधी मिळाली आहे व ही संधी सोडणे त्याच्या जिवावर आले. त्यामुळे जागतिक स्पर्धेसाठी शंभर टक्के तंदुरुस्ती नसूनही तो या स्पर्धेत सहभागी झाला. तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही, याबाबतचे त्याचे पितळ तेथे झालेल्या वैद्यकीय चाचणीत लगेचच उघडकीस आले. ऑलिम्पिक कांस्यविजेत्या खेळाडूकडून तंदुरुस्तीबाबत असा बनाव होणे, ही आपल्या देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारीच गोष्ट ठरली.
योगेश्वर हा तंदुरुस्त नसताना त्याला जागतिक स्पर्धेसाठी पाठवणे, ही गोष्टच मनाला खटकणारी आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची परदेशात रवाना होण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी घेतली जाते. जागतिक स्पर्धेसाठी योगेश्वरबाबत शंभर टक्के तंदुरुस्त असल्याचा दाखला देणारा वैद्यकीयतज्ज्ञही योगेश्वरइतकाच याप्रकरणी दोषी आहे. अमेरिकेत पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष लढतीपूर्वी तो तंदुरुस्त होईल असे वाटल्यामुळे त्याला तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र दिले गेले व त्याला अमेरिकेला जाण्यास परवानगी देण्यात आली, अशी सारवासारव भारतीय कुस्ती महासंघाकडून करण्यात आली. योगेश्वरला भाग घेण्याची परवानगी नाकारल्यामुळे त्याच्यासाठी झालेल्या खर्चाची भरपाई तो व कुस्ती महासंघाचे वैद्यकीयतज्ज्ञ यांच्याकडून केली पाहिजे. खेळाडू कितीही मोठा असला तरी बेशिस्तपणा खपवून घेणे ही मानसिकता बदलली पाहिजे. या घटनेमुळे उदयोन्मुख खेळाडूंपर्यंत चुकीचा संदेश पोहोचतो. तसेच योगेश्वरच्या जागी अन्य गुणवान व होतकरू मल्लास पाठविले गेले असते तर त्याला जागतिक स्पर्धेचा अनुभव मिळाला असता.
जागतिक स्पर्धा आगामी ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरी होती. मात्र ऑलिम्पिकसाठी आणखीही दोन-तीन स्पर्धामध्ये पात्रता पूर्ण करण्याची संधी योगेश्वरला होती. त्याने स्वत:बरोबर दुसऱ्या मल्लाची संधीही वाया घालवली. ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य व एक कांस्यपदक मिळवणाऱ्या सुशील कुमारचा आदर्श त्याने ठेवला पाहिजे होता. तो शंभर टक्के तंदुरुस्त नसल्यामुळे जागतिक स्पर्धेत सहभागी झाला नाही व नरसिंग यादवला जागतिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळवून दिली.
भारतीय कुस्ती क्षेत्रात अनेक वेळा बेशिस्तपणाच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय शिबिरात वेळेवर उपस्थित न राहणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबरच प्रशिक्षकांवरही भारतीय कुस्ती महासंघाने कारवाईचा बडगा दाखविला होता. अशा कारवाया तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. साटेलोटे करीत या कारवाया मागे घेतल्या जातात. परदेशी संघटकांचे अनुकरण आपले संघटक करीत असतात. मात्र त्यांच्याप्रमाणे शिस्तपालनाचेही अनुकरण केल्यास पुन्हा आपल्या देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळणार नाही व कुस्तिगिरांच्या मनमानीपणावर अंकुश लावला जाईल अशी अपेक्षा आहे .