नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू नरसिंह यादव करोनामुक्त झाला असून तो आता सर्बियामध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक कु स्ती स्पर्धेत सहभागी होणार आहे.

नरसिंहची दुसऱ्यांदा घेण्यात आलेली करोना चाचणी नकारात्मक आली आहे. याबरोबरच नरसिंहचे स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये पुनरागमन होणार आहे. उत्तेजक प्रकरणात दोषी आढळल्याने नरसिंहवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली होती. नरसिंहची निवड जितेंदर किन्हाच्या जागी ७४ किलो वजनी गटात करण्यात आली आहे. १४ डिसेंबरला भारताचा पुरुषांचा कुस्ती संघ बेलग्रेडला रवाना होणार आहे.

‘‘मला थोडा खोकला झाला होता. ताप आणि करोनासंबंधी अन्य लक्षणे नव्हती. त्यामुळे करोना चाचणी नकारात्मक येणार याची खात्री होती. त्याप्रमाणे करोनामुक्त झाल्यानंतर आता सर्बियाला विश्वचषकात खेळण्यासाठी जाण्याच्या तयारीत आहे. जागतिक स्पर्धा किंवा विश्वचषक यांच्यापैकी कोणतीही स्पर्धा असली तरी ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत अनेक वर्षांनी सहभाग घेत आहे,’’ असे नरसिंहने सांगितले.