जागतिक कुस्ती स्पर्धा

२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातलेला महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याने मंगळवारी झालेल्या भारतीय संघाच्या निवड चाचणीत रविंदर याच्यावर मात करत कझाकस्तान येथे १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सुशील कुमार यानेही भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

६१ किलो वजनी गटात राहुल याच्यासमोर नवीनचे आव्हान होते. पण त्याला ९-६ अशी धूळ चारत राहुलने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत रविंदरला ६-२ असे सहज हरवत राहुलने भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले. सुशील कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतींशी झगडत होता. मात्र ७४ किलो वजनी गटात त्याने अंतिम फेरीत जितेंद्र कुमारला ४-२ असे नमवून जागतिक स्पर्धेसाठी जागा मिळवली. सुशीलने आक्रमक खेळ करत सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत सुशीलच्या डावपेचांमुळे जितेंदरच्या गुडघ्याला दुखापत झाली. जितेंदरने अखेरच्या क्षणी सुशीलचा पाय पकडत दोन गुण वसूल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. राष्ट्रीय स्पर्धेत अनेक विजेतेपदे पटकावणारा अमित धानकर याला याच गटात जितेंदरकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय कुस्ती संघटनेने जितेंदरसमोर ७९ किलो गटातून लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

भारताचा फ्रीस्टाइल कुस्ती संघ :

रवी दहिया (५७ किलो), राहुल आवारे (६१ किलो), बजरंग पुनिया (६५ किलो), करन (७० किलो), सुशील कुमार (७४ किलो), जितेंदर किंवा विरदेव गुलिया (७९ किलो), दीपक पूनिया (८६ किलो), प्रवीण (९२ किलो), मौसम खत्री (९७ किलो), सुमित मलिक (१२५ किलो).