ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने व्यक्त केली खेळाडूंची व्यथा

नवी दिल्ली : कोणताही खेळाडू स्पर्धेत सहभागी होताना पदक मिळवण्याच्या इराद्यानेच उतरलेला असतो. आपल्याकडे जनतेने बोट दाखवून पाणउतारा करून घेणे कुणालाही आवडत नाही. त्यामुळेच पदकांविना परतल्यावर लोकांना सामोरे जाण्याचे दु:ख काय असते, ते खेळाडूच जाणू शकतो, अशा शब्दांत कुस्तीपटू साक्षी मलिकने खेळाडूंची व्यथा बोलून दाखवली.

एप्रिलमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील साक्षीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तसेच गेल्या काही काळापासून ती फारशी लयीत नाही, असेदेखील बोलले जात आहे. सुशील कुमार, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी यांना आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वीच्या चाचण्यांतही सहभागी न होण्याची परवानगी कुस्ती संघटनेने दिली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेबाबत साक्षी म्हणाली, ‘‘रिंगणात उतरल्यानंतर प्रत्येक वेळी आम्ही पदक जिंकण्याच्या इराद्यानेच खेळत असतो. कुणीही आमच्याकडे बोट दाखवू नये, ही आमची इच्छा असल्याने तसेच ज्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देऊ शकत नाही, अशा प्रश्नांना सामोरे जाण्याची आमची मानसिकता नसते.’’

‘‘आम्ही सराव करताना कोणतीच कसूर करत नाही. पण प्रत्येक खेळाडूच्या जीवनात चढ-उतार येतच असतात. रिओ ऑलिम्पिकनंतरदेखील मी काही स्पर्धामध्ये दमदार कामगिरी केली. पण कधी खूप सराव करूनही विजयी पताका फडकावणे शक्य होत नाही. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच बौद्धिक तंदुरुस्तीवरही भर देत आहे,’’ असे साक्षीने नमूद केले.

राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मी सुवर्णपदक मिळवण्याच्या इराद्याने उतरले होते, मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मी पदकाचा रंग ठरवलेला नाही. केवळ पदक मिळवण्यासाठी खेळायचे असे मी ठरवले आहे. मी पदक मिळवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार, बाकी जे होणार असेल ते ईश्वरी इच्छेनुसार होईल!

– साक्षी मलिक, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू